Eknath Shinde On Waqf Amendment Bill : केंद्र सरकारने संसदेत मांडलेल्या वक्फ बोर्ड सुधारणा विधेयकाला जोरदार विरोध होत आहे. केंद्रीय पातळीवर तसेच राज्य पातळीवरही विरोधी बाकावर बसलेले नेतेमंडळी या विधेयकाला टोकाचा विरोध करत आहेत. महाराष्ट्रातही या विधेयकावरून विरोधकांकडून केंद्र सरकार तसेच भाजपाला लक्ष्य केलं जातंय. ठाकरे गटाचे नेते संजय राऊत (Snjay Raut) यांनी वक्फ सुधारणा विधेयक आणि हिंदुत्त्वाचा काहीही संबंध नाही, असे म्हणत सत्ताधाऱ्यांना लक्ष्य केलंय. राऊतांच्या याच भूमिकेवर आता उपमुख्यमंत्री तथा शिवसेना (शिंदे गट) पक्षाचे प्रमुख एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी कठोर शब्दांत टीका केली आहे.
आम्ही खुलेआम भूमिका घेतो- शिंदे
एकनाथ शिंदे यांनी माध्यम प्रतिनिधींनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं दिली. यावेळी त्यांनी राऊत यांनी केलेल्या विधानावरही भाष्य केलं. वक्फ बोर्डाच्या संदर्भात आम्ही शिवसेनेची भूमिका स्पष्ट केलेली आहे. आम्ही सोईचं राजकारण कधीही करत नाही. सोईचं राजकारण करणारे लोक वक्फ बोर्डाचा हिंदुत्वाशी संबंध नाही, असं म्हणतात. म्हणूनच त्यांच्या भूमिकेवर संशय निर्माण होतो. आम्ही जी भूमिका घेतो ती खुलेआम घेतो. बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांच्या विचारांप्रमाणे आम्ही सर्व निर्णय खुलेपणाने घेतो, असं एकनाथ शिंदे म्हणाले.
आज वक्फच्या संपत्तीवर कोणाचेही नियंत्रण नाही- शिंदे
“आम्ही दुटप्पी भूमिका घेत नाही. आम्ही सडेतोड आणि सामान्य माणसाच्या हिताची भूमिका घेतलेली आहे. वक्फ बोर्डाची संपत्ती मूठभर लोकांच्या हातात ठेवण्यापेक्षा समाजातील बहुसंख लोकांना या संपत्तीची सुविधा मिळाली पाहिजे, अशी आमची भूमिका आहे. शाळा झाल्या पाहिजेत, रुग्णालये झाली पाहिजेत. आज वक्फच्या संपत्तीवर कोणाचेही नियंत्रण नाही. त्यामुळेच हे वक्फ बोर्ड दुरुस्ती विधेयक हे मुस्लीम समाजाच्याही हिताचे आहे,” अशी भूमिका एकनाथ शिंदे यांनी मांडली.
…त्यामुळेच त्यांची अशी परिस्थिती झाली
“पळपुटी भूमिका कशाला घ्यायची. कोणत्याही एका भूमिकेवर उभे राहायला हवे. जेव्हा फायद्याची गोष्ट असेल तेव्हा धरायचं आणि तोटा होत आहे, हे दिसत असेल तर भूमिका सोडायची असा प्रकार कशाला हवा. धरलं की चावतंय सोडलं की पळतंय अशा प्रकारची भूमिका घेतल्यामुळेच त्यांची अशी ही परिस्थिती झालेली आहे,” अशी बोचरी टीका शिंदे यांनी ठाकरे गटावर केली.
पालिका निवडणुकीतही जनता त्यांना जागा दाखवणार- शिंदे
तसेच, “विधानसभेच्या जागेवर त्यांनी 100 जागा लढवल्या. त्यांच्या फक्त 20 जागा निवडून आल्या. यापुढेही मुंबई पालिकेच्या निवडणुका किंवा इतर स्थानिक संस्थांच्या निवडणुकीत जनता त्यांना जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही,” अशा विश्वास एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला.
राहुल गांधींचे नाव घेत ठाकरेंच्या शिवसेनेवर टीका
शेवटी बोलताना “ते बाळासाहेबांच्या विचाराची भूमिका घेऊन पुढे जाणार आहेत, की काँग्रेसचे नेते राहुल गांधी जे सांगतील तसं ते वागणार आहेत, हे आता बघायचं आहे,” असा टोलाही एकनाथ शिंदे यांनी लगावला. त्यामुळे शिंदे यांच्या या शेलक्या टीकेवर उद्धव ठाकरे यांची शिवसेना काय प्रतिक्रिया देणार याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.