Ramesh chennithala: वाद संपवा, कामाला लागा; कॉंग्रेसचे प्रभारी रमेश चेन्नीतला यांचे पदाधिकाऱ्यांना निर्देश

मुंबई : गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेचा विषय ठरलेल्या मुंबई काँग्रेसमधील अंतर्गत वादाबाबत काँग्रेस प्रभारींकडे पुन्हा एकदा तक्रारींचा पाऊस पाडण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. या प्रश्नी प्रभारी रमेश चेन्नीतला हे लवकरच दिल्लीत अहवाल सादर करणार असल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे. त्याचप्रमाणे मुंबईतील अंतर्गत वादासंदर्भात आणि पक्षाच्या सध्याच्या रणनितीबाबत पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्याकडे तब्बल २५ जणांच्या सह्यांचे पत्र पाठविण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली. दरम्यान, मंगळवारी मुंबईत झालेल्या बैठकीत यासंदर्भात मुंबई काँग्रेस पदाधिकाऱ्यांना कानपिचक्या देत वाद विसरून विधानसभेसाठी कामाला लागण्याची सूचना चेन्नीतला यांनी केली असल्याचे सूत्रांनी सांगितले.

मुंबई काँग्रेसमधील अंतर्गत वादाबाबत काही दिवसांपूर्वीच दिल्लीतील बैठकीत पडसाद उमटले होते. खर्गे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत मुंबई काँग्रेसमधील अनेक नेत्यांनी नाराजी बोलून दाखविली होती. त्याचवेळी खर्गे यांनी काँग्रेसचे महाराष्ट्राचे प्रभारी रमेश चेन्नीतला यांच्यावर यासंदर्भात जबाबदारी देत याप्रश्नी बैठक घेण्याची सूचना केली होती. त्यानुसार मुंबई पश्चिम उपनगरातील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये यासंदर्भात नुकतीच बैठक घेण्यात झाल्याची माहिती समोर आली आहे.

मुंबई काँग्रेसच्या राजकीय व्यवहार समितीच्या झालेल्या या बैठकीत एकूण ११ जणांपैकी १० जण उपस्थित होते. या बैठकीत खासदार चंद्रकांत हंडोरे यांच्याशिवाय इतर सर्व सदस्य उपस्थित होते. या बैठकीत मुंबई काँग्रेसमधील अनेक बड्या नेत्यांनी मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षांविरोधात थेट नाराजी व्यक्त केली आहे. पक्षाने लोकसभा निवडणुकीबाबत रणनिती ठरवताना या नेत्यांना विचारात न घेतल्याची तक्रार करण्यात आली. त्याशिवाय पक्षातील इतर नियुक्ता करतानाही तेथील विभागीय नेत्यांना विचारात घेतले जात नसल्याची खंत यावेळी अनेकांकडून व्यक्त करण्यात आली. या बैठकीत चेन्नीतला यांनी यासंदर्भात मुंबई काँग्रेस अध्यक्षांसह इतरही अनेक पदाधिकाऱ्यांना कानपिचक्या दिल्याचे कळते. यासंदर्भात सर्व पदाधिकाऱ्यांनी वाद विसरुन विधानसभेसाठी एकत्रित कामाला लागण्याचे आदेश यावेळी त्यांनी दिले. यासंदर्भात मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षा वर्षा गायकवाड यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता तो होऊ शकलेला नाही.

विधानसभांच्या जागांबाबत चर्चा

आगामी विधानसभा निवडणुकीत काँग्रेस मुंबईत किती जागा लढू शकते, यासंदर्भातही या बैठकीत चर्चा झाल्याचे कळते. मुंबईत किती जागांवर काँग्रेस जिंकून येऊ शकते, उमेदवार कोण असू शकतो, याची संभाव्य यादी तयार करण्याचे आदेश चेन्नीतला यांनी या बैठकीत दिले.