बारामतीत पार पडलेल्या या स्वाभिमानीच्या राज्य कार्यकारिणी बैठकीत आगामी निवडणुकीतील पक्षाची रणनीती काय असेल आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर मंथन करण्यात आले आणि महत्वाचे ठराव पारित करण्यात आला.
स्वाभिमानी शेतकरी संघटनेने एकूण १४ ठराव पारित केले आहेत. त्या ठरावांचा सरकारकडे पाठपुरावा करणार आहोत. जर सरकारने या मागण्या मान्य केल्या तर आम्ही सरकार बरोबर असू अन्यथा आम्ही आमची एकला चलो रे भूमिका पार पाडू, असे देखील राजू शेट्टी यांनी नमूद केले आहे.
महाविकास आघाडी निवडावी की महायुती या विषयावर मात्र राजू शेट्टी यांची संदिग्धता दिसली. राजू शेट्टी म्हणाले, विधानसभेला कोणाबरोबर यासंदर्भात अद्याप आमचा निर्णय झालेला नाही. आम्हाला फक्त सत्ताच हवी असे नाही, तर शेतकऱ्यांचे प्रश्न आमच्यासाठी महत्वाचे आहेत.
या कार्यकारिणीत एक महत्त्वाचा ठराव पारित करण्यात आला. तो म्हणजे, वयाची पस्तीशी ओलांडलेल्या अविवाहित तरुणांची परिस्थिती गंभीर आहे. शेतकऱ्यांच्या इतर प्रश्नांपेक्षा हा प्रश्न देखील गंभीर बनत चालला आहे. शेतीशी निगडीत हा प्रश्न असल्यामुळे शेती करणाऱ्या मुलांची आर्थिक परिस्थितीमुळे लग्न होत नाहीत. सामाजिक बांधिलकी म्हणून पाच लाख रुपये स्त्रीधन त्यांना द्यावे, तसेच जिल्हा उद्योग केंद्रामार्फत नवविवाहित जोडप्यांना २५ लाख रुपयांचे प्राधान्याने कर्ज वाटप करावे, असे ठरावात नमूद करण्यात आले आहे.
एक जुलैपासून कर्जमाफीसाठी आंदोलन
बैठकीतील ठरावानुसार संपूर्ण कर्जमाफी व वीजबिल माफीसाठी हरितक्रांतीचे जनक डॉ. वसंतराव नाईक कर्जमुक्ती योजना लागू करावी, या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना माजी खासदार राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली एक जुलैपासून राज्यभर आंदोलन करणार आहे.