बीडमध्ये राखेतून गुंड निर्माण होतात… संतोष देशमुख प्रकरणावरून राज ठाकरे यांचा घणाघात

आज मनसेचा गुढीपाडवा मेळावा पार पडला, या मेळाव्यात मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी चौफेर फटकेबाजी केली. त्यांनी राजकीय नेत्यांचे चांगलेच कान टोचले. यावेळी बोलताना त्यांनी बीड जिल्ह्यातल्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याप्रकरणावरून देखील जोरदार हल्लाबोल काला. आपण आपले विषय बाजूला ठेवतो आणि भलत्याच गोष्टी काढतो. संतोष देशमुख यांना घाणेरड्या प्रकारे मारलं. किती घाणेरड्या प्रकारे मारावं. तुमच्या अंगात नसानसात एवढी क्रूरता असेल तर मी दाखवेन जागा, असं राज ठाकरे यांनी म्हटलं आहे.

पुढे बोलताना ते म्हणाले की, हे झालं कशातून. विंड मिल, वीज प्रकल्पातून निर्माण होणारी राख याच्यामधून,  मी ऐकलं होतं राखेतून फिनिक्स पक्षी उभारी घेतो. आमच्या बीडमध्ये राखेतून गुंड निर्माण होतात. विषय होता पैशांचा. देशमुखांनी विरोध केला. तिथे संतोष देशमुख नसते कोणी दुसरं असतं तर तेच केलं असतं. विषय होता, पैशांचा, खंडणीचा,  आपण लेबल काय लावलं? वंजाऱ्याने मराठ्याला मारलं. त्यात वंजाऱ्यांचा काय संबंध आणि मराठ्यांचा काय संबंध, कशात गुंतून पडतोय. पण तुम्हाला गुंतवलंय जातं आहे. राजकीय पक्ष तुम्हाला गुंतवतात, असं राज ठाकरे यांनी म्हटलं आहे.

तुम्ही मुलांच्या शिक्षणाचा विचार करू नका. दिवसाला सात शेतकऱ्यांच्या आत्महत्या होतात. लक्ष देऊ नका. रोजगाराकडे लक्ष देऊ नका. आपल्याला जातीपातीत अडकवलं. कोणी जातीचं भलं केलं नाही. संयुक्त महाराष्ट्र झाल्यानंतर इतकी वर्ष जास्तीत जास्त आमदार, मंत्री, मुख्यमंत्री मराठा समाजाचे होते. मग मराठा समाजाला आरक्षण का मागावं लागतं? काय केलं या आमदारांनी, मुख्यमंत्र्यांनी आणि मंत्र्यांनी. माझ्या मराठा समाजाला समजा आरक्षण मागावं लागत असेल तर एवढे  आमदार, खासदार मुख्यमंत्री, मंत्री का निवडून दिले. त्यांनी काय केलं. जात जातीला कधीच सांभाळत नाही. फक्त मते घेण्यासाठी तुमचा वापर करतात, असं राज ठाकरे यांनी यावेळी म्हटलं.

(सूचना: ही बातमी विविध स्त्रोतांमधून एकत्रित करण्यात आलेली आहे. आमच्याकडून यामध्ये कोणतेही संपादन केलेले नाही. मूळ स्त्रोतांची माहिती आणि मालकी कायम आहे.)