राज ठाकरे-उद्धव ठाकरे गुढीपाडव्याला एकत्र येणार? ठाकरे बंधू मिलन कार्यक्रमाची निमंत्रण पत्रिका व्हायरल

राज्यात लोकसभा आणि विधानसभा निवडणुका पार पडल्यानंतर सध्या सर्वच पक्षाकडून महापालिका निवडणुकांची तयारी केली जात आहे. त्यातच विधानसभा निवडणुकीनंतर ठाकरे बंधूंनी एकत्र यावं अशी भावना सर्वच मराठी माणसांकडून व्यक्त केली जात आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे हे एकत्र यावे यासाठी आता मुंबईतील मराठी सेना अॅक्शन मोडमध्ये आली आहे. येत्या गुढीपाडव्याच्या निमित्ताने ठाकरे बंधू मिलन कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. मुंबईत हा कार्यक्रम पार पडणार आहे.

राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी एकत्र यावे यासाठी मुंबईतील मराठी सेना अॅक्शन मोडमध्ये आली आहे. येत्या ३० मार्च रोजी ठाकरे बंधू मिलनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. यापूर्वी मराठी सेना पक्षाने दादर सेना भवन परिसरात राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी एकत्र यावे अशा आशयाचे बॅनर लावले होते. त्यानिमित्ताने आज बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळावर निमंत्रण पत्रिका ठेवली आहे. ही निमंत्रण पत्रिका ठेवून बंधूत्वाचा संदेश देण्याचा प्रयत्न सुरु करण्यात आला आहे. येत्या गुढीपाडव्याला हा कार्यक्रम पार पडणार आहे. या कार्यक्रमासाठी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांना निमंत्रित केलं जाणार आहे.

निमंत्रण पत्रिकेत काय?

बंधू मिलन निमंत्रण, भाऊ माझा आधार, माझ्या ध्येयाचा किनारा, आयुष्याच्या प्रत्येक सुख दुःखाचा सोबती, भाऊ माझ्या जीवनाचा आधार.
बंधू मिलन कार्यक्रम दिनांक ३० मार्च २०२५ रोजी छत्रपती शिवाजी महाराज मैदान मुंबई येथे सकाळी ११ वाजता स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृती स्थळाजवळ घेण्याचे योजिले आहे. मराठी माणसाच्या हितासाठी एकत्र येण ही काळाची गरज आहे, तरी आपली उपस्थिती वंदनीय असेल, असे या निमंत्रण पत्रिकेत नमूद करण्यात आले आहे. मोहनिश रविंद्र राऊळ यांनी ही निमंत्रण पत्रिका बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळावर ठेवली आहे.

invite

“महाराष्ट्राला सध्या या दोघांची गरज”

“आज होळीचा सण आहे, त्यामुळे होळीला सर्व काही विसरुन राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी एकत्र यावे. बंधू बंधूसाठी धावून येतो. महाराष्ट्राला सध्या या दोघांची गरज आहे. तसेच एका सक्षम नेतृत्वाची गरज आहे. मराठी माणूस मराठी माणसासोबत भांडतो. दोन गटात विभाजन झाले आहे. दोन ठाकरे ब्रँड वेगळे झाले आहेत. जर ते एकत्र आले तर कुठेतरी मराठी माणसाला किंवा विविध कामगार सेनेला बळ मिळेल”, अशी भावना मोहनिश रविंद्र राऊळ यांनी व्यक्त केली आहे.

(सूचना: ही बातमी विविध स्त्रोतांमधून एकत्रित करण्यात आलेली आहे. आमच्याकडून यामध्ये कोणतेही संपादन केलेले नाही. मूळ स्त्रोतांची माहिती आणि मालकी कायम आहे.)