मनसेच्या गुढीपाडवा मेळाव्यात मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी चौफेर फटकेबाजी केल्याचं पाहायला मिळालं. औरंगजेबच्या कबरीपासून ते नदीच्या प्रदूषणापर्यंत आणि संतोष देशमुख यांचं हत्याप्रकरण ते मराठी भाषा अशा विविध मुद्द्यांवर त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. उद्यापासून कामाला लागा, महाराष्ट्रातील प्रत्येक बँकेत मराठी वापरली जाते की नाही चेक करा. प्रत्येक अस्थापनेत ही बाब तपासून पाहा, असे आदेश या मेळाव्यातून राज ठाकरे यांनी आपल्या कार्यकर्त्यांना दिले होते.
दरम्यान राज ठाकरे यांच्या या आदेशानंतर लोणावळ्यामध्ये मनसेच्या कार्यकर्त्यांनी मराठी भाषच्या मुद्द्यावरून बँक ऑफ महाराष्ट्रच्या शाखेत चांगलाच राडा केला. मनसैनिकांनी कर्मचाऱ्याच्या कानाखाली लावल्याचा देखील प्रकार समोर आला. या घटनेनंतर आता या प्रकरणावर समिश्र प्रतिक्रिया उमटत आहेत, ज्येष्ठ वकील गुणरत्न सदावर्ते यांची देखील प्रतिक्रिया समोर आली आहे, त्यांनी राज ठाकरे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे.
नेमकं काय म्हणाले गुणरत्न सदावर्ते?
राज ठाकरे काय कायद्यापेक्षा मोठे नाहीत, त्यांची टोळकी बँका तसेच वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन धुडगूस घालतात, ती थांबायला हवी. मी मुख्यमंत्री, पोलीस महासंचालक आणि सबंधित अधिकाऱ्यांना यासंदर्भात तक्रार अर्ज देणार आहे. अशा टोळक्यांविरोधात कायदेशीर कारवाई करावी ही मागणी त्यात आहे. उद्या मी पोलीस आयुक्तालयात जाऊन तक्रार देणार आहे.
दरम्यान कुणाल कामरा याने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संदर्भात सादर केलेल्या एका विडंबनात्मक काव्यामुळे मोठा गोंधळ निर्माण झाला होता. शिवसैनिक आक्रमक झाले, कुणाल कामराच्या स्टुडिओची तोडफोड करण्यात आली. यावर देखील गुणरत्न सदावर्ते यांनी प्रतिक्रिया दिली आहे. राजकीय नेत्यांच्या धमकीमुळेच त्याला अटकेपासून सुरक्षा देण्यात आली असून त्याला जामीन मिळाला आहे. राजकीय नेत्यांचा भावना समजू शकतात, पण भावनिक होऊन धमकी देणे टळले पाहिजे. कुणाल कामरानेही आपल्या कॉमेडीमधून राजकीय भाषा बोलणं टाळलं पाहिजे, असं गुणरत्न सदावर्ते यांनी म्हटलं आहे. दरम्यान मनसे आता गुणरत्न सदावर्ते यांच्या टीकेला काय प्रत्युत्तर देणार हे पाहाणं महत्त्वाचं ठरणार आहे.