राज ठाकरे यांनी गंगा मातेचा अपमान केला; शिवसेना आक्रमक, पहिली प्रतिक्रिया

महाकुंभ २०२५मध्ये जाऊन अनेक दिग्गज राजकारण्यांपासून ते सर्वसामान्यांनी पवित्र स्नान केले. जगभर महाकुंभची चर्चा सुरु होती. दरम्यान, आज ९ मार्च रोजी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात राज ठाकरे यांनी महाकुंभचा उल्लेख करत किस्सा सांगितला. हा किस्सा सांगताना ते म्हणाले होते की, ‘आमचे बाळा नांदगावकर कमंडलूमधून (महाकुंभमधून) पाणी घेऊन आले. म्हटलं हड.. मी नाही पिणार.’ राज ठाकरेंच्या या वक्तव्यावर शिवसेना आक्रमक झाली आहे.

राज ठाकरे यांच्या महाकुंभ आणि गंगा वरील भाषणानंतर शिवसेना आक्रमक झाली असून पहिली प्रतिक्रिया आली आहे. शिवसेना नेते संजय निरुपम यांनी राज ठाकरेंवर निशाणा साधला आहे. संजय निरुपम म्हणाले, ‘जगभरातील ६० कोटींहून अधिक हिंदू आणि सनातनींनी महाकुंभात पवित्र स्नान केले. राज ठाकरे यांनी गंगा मातेचा अपमान केला आहे. राज ठाकरे हे त्यांच्या भूमिका बदलण्यासाठी बदनाम आहेत.’

पुढे संजय निरुपम यांनी राज ठाकरेंना निवडणूकीवरुन प्रश्न केला आहे. ‘राज ठाकरे दुसऱ्या कोणत्या गटाशी हातमिळवणी करून निवडणूक लढवण्याची तयारी करत आहेत का? असे प्रश्न उपस्थित होत आहेत’ असे म्हटले आहे.

नेमकं प्रकरण काय?

राज ठाकरे यांनी एका बैठकीतील किस्सा सांगितला. त्यात काही जण बैठकीला हजर झाले नव्हते. त्यांनी याविषयी झाडाझडती घेतली होती. “मुंबईत एक बैठक लावली होती. मुंबईतील शाखा अध्यक्ष , उपाध्यक्ष हजर झाले नाहीत. त्यांची हजेरी घेतली. प्रत्येकाला विचारलं, कारणं एक एक दिली. घरचे ते आजारी, हे होतं, ते होतं. पाच सहा जणांनी सांगितलं कुंभला गेलो होतो. म्हटलं गधड्यांनो पापं करता कशाला. हेही विचारलं आल्यावर अंघोळ केली ना?” असे राज ठाकरे म्हणताच पदाधिकार्‍यांमध्ये आज खसखस पिकली.

आमचे बाळा नांदगावकर कमंडलूमधून पाणी घेऊन आले. म्हटलं हड.. मी नाही पिणार, असे राज ठाकरे म्हणताच कार्यक्रमस्थळी हस्याचा कडेलोट झाला. त्यांनी यावेळी धार्मिक अंधश्रद्धेवर चांगलाच आसूड ओढला. त्यांनी या गोष्टींबाबत समाजाचे प्रबोधन केले. राज ठाकरे यांनी धार्मिक अंधश्रद्धांवर हंटर हाणला.

ते म्हणाले, “मला सांगा, पूर्वीच्या काळी ठिक होतं. आता सोशल मीडिया आला. माणसं, तिथं आलेल्या बायाबिया घासतात. आणि बाळा नांदगावकर साहेब गंगेचं पाणी. अरे कोण पेईल ते पाणी. चला आताच करोना गेला. त्याच्याशी कोणाला घेणं देणं नाही. दोन वर्ष तोंडाला फडकी बांधून फिरले. तिकडे जाऊन आंघोळ करतात. मी कित्येक स्विमिंग पुल पाहिले. आधी निळे होते. नंतर हिरवे झाले. कोण जाऊन पडेल त्यात. त्याने तिथे काही तरी केलं, ते मी इथे पितो.”

(सूचना: ही बातमी विविध स्त्रोतांमधून एकत्रित करण्यात आलेली आहे. आमच्याकडून यामध्ये कोणतेही संपादन केलेले नाही. मूळ स्त्रोतांची माहिती आणि मालकी कायम आहे.)