मुंबई शहरासह उपनगरात अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. मुंबई उपनगरातील कांदिवली, बोरिवली आणि दहिसर भागात जोरदार वाऱ्यासह हलक्या सरी कोसळताना दिसत आहे. तसेच सायन, कुर्ला आणि चुनाभट्टी परिसरातही रिमझिम पाऊस पडताना दिसत आहे.
हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार, मुंबईसह महाराष्ट्रात अनेक ठिकाणी अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. ठाण्यात सध्या जोरदार पाऊस सुरु आहे. ऐन मे महिन्यातच पाऊस कोसळल्याने उकाड्याने त्रस्त झालेल्या राज्यातील नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला आहे. मात्र अचानक आलेल्या पावसामुळे त्यांची चांगलीच तारांबळ उडाली. गेल्या काही दिवसांपासून तापमानात मोठी वाढ झाली असल्याने ठाणेकर उकाड्याने हैराण झाले होते. आता या पावसामुळे तापमानात घट होण्याची शक्यता आहे. अंबरनाथ शहरातही अवकाळी पावसाने जोरदार सुरुवात केली. अंबरनाथमध्ये सोसाट्याचा वारा आणि धुळीचे वादळ पाहायला मिळत आहे. अंबरनाथमध्ये पावसामुळे अनेक भागांतील वीज पुरवठा खंडित झाला आहे.
कल्याणमध्येही सोसाट्याच्या वाऱ्यासह पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. ज्यामुळे घरी परतणाऱ्या चाकरमान्यांची मोठी तारांबळ उडाली. तसेच पावसामुळे कल्याणमध्ये अनेक ठिकाणी बत्ती गुल झाली आहे. महावितरणकडून वीज पुरवठा सुरळीत करण्यात अडचणी येत आहेत.
वसई-विरार परिसरात रात्री अचानक झालेल्या अवकाळी पावसाने जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले. जोरदार वादळी वाऱ्यासह कोसळलेल्या पावसाच्या धारांमुळे अनेक ठिकाणी मोठे नुकसान झाले आहे. यामुळे नागरिकांची मोठी तारांबळ उडाली. वसईतील विविध भागांमध्ये फुलझाडांच्या बागांचे मोठे नुकसान झाले आहे. जोरदार वाऱ्यामुळे झाडांच्या फांद्या तुटल्या, फुलांचे नुकसान झाले. तर विरारमध्ये एका हळदी समारंभाला या अवकाळी पावसाचा मोठा फटका बसला. समारंभासाठी उभारलेले मंडप कोसळले, तर विद्युत उपकरणे आणि सजावटीचे साहित्य भिजल्याने मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. पावसामुळे अनेक रस्त्यांवर पाणी साचले आहे. अचानक आलेल्या या पावसामुळे नागरिकांची धांदल उडाली असून, हवामान खात्याने पुढील काही तासांत आणखी पावसाची शक्यता वर्तवली आहे.