Rain Update: कोकण, मराठवाड्याला पावसाचा यलो अलर्ट, मुंबई-पुण्यात काय परिस्थिती? वाचा वेदर रिपोर्ट

मुंबई: राज्यात मान्सूनने वेळेपूर्वीच दमदार हजेरी लावली. पण, गेल्या काही दिवसांपासून पावसाने दडी मारली आहे. मुंबईसह अनेक भागातून पाऊस गायब झाल्याचं चित्र आहे. रविवारी मुसळधार पाऊस पडेल असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला होता. मात्र, रविवारीही मान्सूनच्या वाटचालीत कुठलीच प्रगती दिसून आली नाही. तर विदर्भ आणि मराठवाड्यातील बऱ्याच भागात अद्याप मान्सून पोहोचलेला नाही.

मुंबई-पुण्यात पावसाची शक्यता

मुंबई-पुण्यासह, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्गात मुसळधार पावसाची शक्यता असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवली आहे. तर, काही भागात वादळीवाऱ्यासह पावसाचा इशाराही देण्यात आला आहे

कोकण-मराठवाड्याला पावसाचा येलो अलर्ट

कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्याच्या काही भागात तुरळक प्रमाणात पावसाच्या सरी बरसत असल्याचं चित्र आहे. तर खान्देश आणि पूर्व विदर्भात अजूनही पाऊस पोहोचलेला नाही. पुढील तीन ते चार दिवसात स्थिती बदलेल अशी शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. रत्नागिरी-सिंधुदुर्गात १८ ते २० जून रोजी तर रायगडला १९ ते २० जूनला यलो अलर्ट देण्यात आलेला आहे. तर मराठवाड्यालाही पावसाचा अलर्ट देण्यात आला आहे.

ऑगस्ट-सप्टेंबरमध्ये चांगला पाऊस

महाराष्ट्रासह अनेक भागांवर दुष्काळाचे सावट आणणारा अल निनोचा प्रभाव संपला आहे. त्यामुळे ऑगस्ट-सप्टेंबर चांगला पाऊस पडेल, असं हवामान विभागाकडून सांगण्यात येत आहे.

जवळजवळ एक वर्ष जागतिक हवामानावर वर्चस्व गाजवल्यानंतर अखेरीस अल निनोचे राज्य संपले आहे. पॅसिफिक महासागर सुमारे दोन महिन्यांच्या कालावधीत ला नीनामध्ये बदलण्याची शक्यता आहे, ज्याचा अर्थ असा आहे की, हंगामाच्या उत्तरार्धात ऑगस्ट-सप्टेंबरमध्ये भारतात चांगल्या पावसाला अनुकूल परिस्थिती निर्माण होईल.