वादळी वाऱ्यासह विजांच्या कडकडाटासह मध्यम स्वरुपाचा पाऊस बरसणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे. राज्याच्या बऱ्याच भागात पावसाच्या सरी कोसळणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे.
गेल्या दहा दिवसांत सरासरीहून अधिक पाऊस
पश्चिम महाराष्ट्रातील पुणे, सातारा, सांगली आणि सोलापूर या जिल्ह्यांमध्ये गेल्या दहा दिवसांत जूनच्या सरासरीपेक्षा जास्त पाऊस झाला आहे. पुण्यात ५०, साताऱ्यात ६२ आणि सोलापूरमध्ये १३३ टक्के पाऊस झाल्याची नोंद झाली आहे.
पुणे विभागातील पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर आणि सोलापूर जिल्ह्यात गेल्या दहा दिवसांत झालेल्या पावसाचा आढावा घेण्यात आला. विभागातील जिल्ह्यांतील दुष्काळी भागात पूर्वमान्सून आणि मान्सूनच्या पावसामुळे शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण असून, पेरण्यांना वेग आला आहे. सांगली जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त तालुक्यांमध्येही सरासरीपेक्षा जास्त पाऊस झाला आहे.
पुणे जिल्ह्यात ८९ मिमी पाऊस
पुणे जिल्ह्यात सरासरी १७६ मिलिमीटर पाऊस पडतो. जूनच्या पहिल्या दहा दिवसांत ८८.९ मिलिमीटर (५०.५ टक्के) पाऊस झाला आहे. बारामती, इंदापूर आणि दौंड या दुष्काळग्रस्त तालुक्यांतही पावसाने सरासरी ओलांडली आहे. पुरंदर, हवेली आणि भोर या तालुक्यांत सरासरीच्या निम्मा पाऊस झाला. उर्वरित तालुक्यांत सरासरीच्या निम्म्याहून कमीच पावसाची नोंद झाली आहे.