Rahul Shewale : दोन आठवड्यांत शीव पुलाचे पाडकाम; खासदार राहुल शेवाळेंची ‘मटा कट्टा’मध्ये माहिती

मुंबई : ‘आयुर्मान पूर्ण झालेल्या धोकादायक शीव रेल्वे उड्डाणपुलावरून सध्या वाहतूक सुरू आहे. मात्र, या पुलाच्या पुनर्बांधणीसाठी त्याचे दोन आठवड्यांच्या आत पाडकाम सुरू करण्याचे रेल्वेचे नियोजन आहे,’ अशी माहिती खासदार राहुल शेवाळे यांनी ‘महाराष्ट्र टाइम्स’च्या ‘मटा कट्टा’ कार्यक्रमात दिली.

आयआयटी आणि मध्य रेल्वेच्या संरचनात्मक तपासणीत शीव रेल्वे उड्डाणपूल धोकादायक असल्याचे निष्पन्न झाले आहे. पुलावरील वाहतूक बंद करण्यासाठी २० जानेवारी, २८ फेब्रुवारी आणि २७ मार्च अशा तारखा जाहीर करण्यात आल्या होत्या. मात्र, विविध कारणांमुळे पुलाचे पाडकाम रखडले आहे. लोकसभा निवडणुकीत मुंबई दक्षिण-मध्य मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार राहुल शेवाळे यांनी याबाबत भाष्य केले.

‘शीव रेल्वे उड्डाणपुलालगतच्या परिसरात १० शाळा आहेत. जानेवारी-फेब्रुवारीमध्ये पूल वाहतुकीसाठी बंद केल्यास शालेय विद्यार्थ्यांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागला असता. यामुळे स्थानिकांनी माझी भेट घेऊन तूर्त पाडकाम पुढे ढकलण्याची विनंती केली होती. स्थानिकांच्या आग्रहामुळे पुलाचे पाडकाम काही दिवसांसाठी स्थगित करण्याची विनंती रेल्वे अधिकाऱ्यांना केली होती. सध्या शाळांना सुट्टी लागली आहे. यामुळे येत्या दोन आठवड्यांत पुलाचे पाडकाम सुरू करण्याचे मध्य रेल्वे अधिकाऱ्यांचे नियोजन आहे,’ असे शेवाळे यांनी सांगितले.
रेल्वेच्या दरवाजात लटकून प्रवास करणं बेतलं जीवावर; कोकणकन्येतून पडून प्रवाशाचा मृत्यू
राज्यात पाचव्या टप्प्यात २० मे रोजी मुंबईतील सहा जागांसाठी मतदान होईल. त्यानंतर पूल पाडण्यासाठी आवश्यक ती प्रक्रिया पूर्ण करण्यात येणार आहे. पुलाचे पाडकाम सुरू केल्यानंतर पुलाच्या पुनर्बांधणीसाठी किमान दोन वर्षांचा कालावधी अपेक्षित आहे, असे रेल्वे अधिकाऱ्यांनी सांगितले.

पाचव्या-सहाव्या मार्गिकेसाठी काम

– मुंबई रेल्वे विकास महामंडळाच्या एमयूटीपी-२ अंतर्गत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते कुर्ला या दरम्यान पाचव्या-सहाव्या मार्गिकेचा प्रकल्प पूर्ण होणार आहे.
– सीएसएमटीतील जागेच्या अडचणीमुळे कुर्ला ते परळ आणि परळ ते सीएसएमटी असे दोन टप्पे करण्यात आले आहेत.
– पहिला टप्पा पूर्ण करताना शीव रेल्वे उड्डाणपूल हा अडथळा असल्याने हा पूल पाडून त्या जागी नवा पूल उभारण्यात येणार आहे.