काँग्रेस खासदार प्रणिती शिंदे आणि राष्ट्रवादीचे (एसपी) खासदार धैर्यशील मोहिते-पाटील यांच्यासह नवनिर्वाचित मविआ खासदारांच्या शिष्टमंडळाने राहुल गांधी यांना यात्रेत सहभागी होण्याचे निमंत्रण दिले. संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज पालखीतील वारकऱ्यांसोबत काही अंतर चालत असताना राहुल गांधी माऊली आणि तुकोबांचे आशीर्वाद घेणार असल्याची पुष्टी काँग्रेसचे आमदार संजय जगताप यांनी केली.
“राहुल गांधींना पंढरीच्या वारीत सहभागी करून घेण्याच्या हालचालीकडे आगामी विधानसभा निवडणुकीपूर्वी MVA चा मतदारांपर्यंत पोहोचण्याचा उद्देश आहे. तसेच मविआ आणखी मजबूत करण्याचा प्रयत्न म्हणून पाहिले जात आहे,” असे जगताप यांनी सांगितले. दोन वेळा महाराष्ट्रातून गेलेल्या भारत जोडो न्याय यात्रेत गांधींना राज्यातील जनतेचा चांगला प्रतिसाद मिळाला.
मात्र, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी राहुल गांधींना वारीत सहभागी होण्याचे निमंत्रण दिले आहे, आता त्यावरू वाद निर्माण झाला आहे. भाजपच्या अध्यात्मिक सेलचे नेते तुषार भोसले यांनी या निमंत्रणावर टीका करत पवारांच्या हेतूवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. “सदैव हिंदूंचा द्वेष करणाऱ्या व्यक्तीला वारीत कसे बोलावले जाऊ शकते? शरद पवार यांच्या गावी गेली अनेक वर्षे वारी जात आहे, परंतु राष्ट्रवादीच्या (एसपी) नेत्याने आयुष्यात कधी वारीत हजेरी लावली नाही,” असा भोसले यांनी आरोप लावला आहे.
भोसले पुढे म्हणाले, “शरद पवार आणि राहुल गांधी हे आगामी महाराष्ट्र विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून वारीत रस दाखवत आहेत.” यात्रेचा एक भाग म्हणून पवार 7 जुलै रोजी काटेवाडी गावातून पालखी सोहळ्याचे स्वागत करतील. आगामी निवडणुकांपूर्वी जनतेशी संपर्क साधण्याचा आणि त्यांची स्थिती मजबूत करण्याचा राजकीय नेत्यांचा हा आणखी एक प्रयत्न असल्याचे बोलले जात आहे.