‘सुजयच्या बोलण्याने साई भक्तांच्या भावना दुखावल्या हे मान्य’, राधाकृष्ण विखे पाटील यांचं स्पष्टीकरण

सुजय विखे पाटील यांच्या वक्तव्यावर राधाकृष्ण विखे पाटील यांची प्रतिक्रिया

साई संस्थानच्या प्रसादालयातील मोफत भोजनावरून विखे पिता-पुत्रांनी वेगवेगळी भूमिका व्यक्त केली आहे. भाजपचे माजी खासदार सुजय विखे म्हणतात, मोफत भोजन बंद करून साईभक्तांकडून शुल्क आकारा. तर वडील मंत्री राधाकृष्ण विखे म्हणताय, साईभक्तांना प्रसाद भोजन निःशुल्क सुरूच राहील. मात्र सुजय विखेंच्या वक्तव्याचा विपर्यास केल्याचंदेखील राधाकृष्ण विखे पाटील यावेळी स्पष्ट करतात. शिर्डीत भिक्षेकऱ्यांचा प्रश्न गंभीर आहे. त्या अनुषंगाने सुजयचे वक्तव्य आहे, असं राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले.

सुजय विखे पाटील काय म्हणाले?

“साई संस्थानच्या प्रसादालयातील मोफत जेवण बंद करा. जे पैसे अन्नदानात जातात ते पैसे आमच्या मुलांच्या आणि मुलींच्या भविष्यासाठी, शिक्षणासाठी खर्च करा. अख्खा देश इथे येऊन फुकट जेवण करतोय. महाराष्टातील सगळे भिकारी इथे गोळा झाले आहेत. हे योग्य नाही. या विरोधात आंदोलनाची वेळ आली तर आम्ही आंदोलन करू. शिर्डीत कोट्यवधी रुपये खर्च करून शैक्षणिक संकुल उभारण्यात आलं. मात्र तिथे चांगले शिक्षक नाहीत. इंग्लिश विषय शिकवणाऱ्यालाच इंग्रजी येत नाही. इंग्लिश विषयाचा शिक्षक मराठीत इंग्लिश शिकवतोय. याचा काय उपयोग?”, असं वक्तव्य सुजय विखे पाटील यांनी केलं.

मंत्री राधाकृष्ण विखे पाटील काय म्हणाले?

“सुजय विखे यांच्या शब्दाचा विपर्यास केला गेला. भिक्षेकऱ्यांचा अवमान करण्याचा त्यांचा हेतू नव्हता. मात्र मध्यंतरी भिक्षेकऱ्यांचा प्रश्न फार गंभीर झाला होता. स्थानिक ग्रामस्थांना आंदोलन करावे लागले. सुजय विखेंनी जो शब्द वापरला त्यामुळे भावना दुखावल्या असतील. हे मी मान्य करतो. मात्र भावना दुखावण्याचा त्यांचा हेतू नव्हता”, असं राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले.

“भिक्षेकरी आणि साईभक्त यांच्यात अनेकदा वाद होऊन कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होतो. त्यामुळे याबाबत काहीतरी नियमावली तयार व्हावी, अशा सूचना प्रशासनाला दिल्या आहेत. शिर्डीत येणाऱ्या साईभक्तांना प्रसाद भोजन मोफत मिळाले पाहिजे. शुल्क आकारण्याची आवश्यकता नाही. साईभक्तांच्या देणगीतूनच महाप्रसाद दिला जातो. तो निरंतर चालू राहील”, असं मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी स्पष्ट केलं.

वडिलांच्या वक्तव्यावर सुजय विखे काय म्हणाले?

वडिलांच्या वक्तव्यानंतर सुजय विखे पाटील यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. “मी माझ्या वक्तव्याशी ठाम राहणार. या वक्तव्याने कुठल्याही साईभक्ताला हिणवण्याचं कारण नाही. मराठी भाषेमध्ये प्रत्येक जण वेगवेगळे अर्थ काढतो. मागील 3 वर्षात 4000 हजार भिकाऱ्यांना पोलिसांनी अटक करून सुधारगृहात पाठवलंय. साईभक्त आमच्यासाठी आदरणीय. भिकारी याचा अर्थ भिकारीच जे पोलिसांच्या अहवालात सांगितलं आहे. शिर्डी विधानसभेत मला माझ्या महिला-भगिनी सुरक्षित ठेवण्याचा पूर्ण अधिकार आहे. साई संस्थानला पुन्हा एकदा माझी विनंती, संस्थांच्या प्रसादालयातील आकारलेल्या पैशांचा वापर विकासासाठी आणि शिक्षणासाठी व्हावा. साईभक्तांना हिणवण्याचा प्रयत्न कोणीही करत नाही”, असं स्पष्टीकरण सुजय विखे पाटील यांनी दिलं आहे.

“मोफत जेवणामुळे शिर्डीत अपराधी लोक, मोस्ट वाॉन्टेड लोक जे साईभक्त नाहीत त्यांची वाढ होतेय. याचा त्रास ग्रामस्थांना होतोय. साई संस्थांच्या प्रसादलायात जेवणाचे 10 रुपये दर आकारले तर योग्य ते मुल्यमापन केलं जाईल. शिर्डीची रचना शिर्डी ग्रामस्थांनी केली आहे. जेव्हा साईबाबा आले तेव्हा शिर्डीचे ग्रामस्थ साईबाबां समवेत होते. मी माझ्या वक्तव्याशी ठाम राहणार, या वक्तव्याने कुठल्याही साईभक्ताला हिणवण्याचं कारण नाही”, असं सुजय विखे म्हणाले.

“भिकारी हा शब्द तंतोतंत लागू होतो जी पोलिसांची आकडेवारी सांगते. जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील याबाबत साई संस्थान प्रशासनासमवेत मिटींग घेणार. मी साईबाबा संस्थानच्या प्रसादालयात गेल्यानंतर पन्नास रुपये भरून ( VIP जेवणासाठी 50 रुपये शुल्क आहेत ) जेवण करतो”, अशी प्रतिक्रिया सुजय विखे पाटील यांनी दिली.

(सूचना: ही बातमी विविध स्त्रोतांमधून एकत्रित करण्यात आलेली आहे. आमच्याकडून यामध्ये कोणतेही संपादन केलेले नाही. मूळ स्त्रोतांची माहिती आणि मालकी कायम आहे.)