एकीकडे निवडणुकांच्या प्रचाराचे वातावरण तापले असताना, शहरातील कमाल आणि किमान तापमानातही गरम झाले आहे. एप्रिलच्या पहिल्या आठवड्यापासूनच यंदा तापमानाचा पारा चढा राहिल्याने पुणेकर सकाळपासूनच उन्हाच्या तीव्र झळांचा अनुभव घेत आहेत. दुपारी रस्त्यावरून फिरताना उन्हाचे चटके आणि घामाच्या धारांमुळे नागरिक हैराण झाले आहेत. किमान तापमानही वाढल्याने रात्रीचा गारवा पूर्ण ओसरला आहे.
पुण्यासह मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात गेल्या आठवड्यात उष्णतेची लाट आली होती, त्यामुळे पुणे शहरासह जिल्ह्यात तापमानाचा पारा ४१ अंशाच्या पुढे गेला होता. मात्र, शुक्रवार आणि शनिवारी दोन्ही दिवस संध्याकाळी पावसाने हजेरी लावल्याने वातावरण सुसह्य होते. सोमवारपासून पुन्हा सरासरीपेक्षा जास्त तापमान वाढले आहे. मंगळवारी दिवसभरात शहरात दिवसभरात कमाल ३९.४ आणि किमान २२.९ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली.
पुणे शहरातील विविध भागात नोंदवले गेलेले कमाल तापमान (अंश सेल्सिअस)
बालेवाडी : ४१.७
वडगाव शेरी : ४१.३
कोरगाव पार्क : ४१
चिंचवड : ४०.८
हडपसर : ४०.७
शिवाजीनगर : ३९.४
पाषाण : ३९.२
एनडीए : ३८.३
हवेली : ३६.७
राज्यातील उच्चांकी तापमान – जळगाव : ४२.७
नीचांकी तापमान – यवतमाळ – १९
महत्त्वाची निरीक्षणे…
विदर्भातील सर्वच जिल्ह्यांत तापमानाचा पारा ४० अंशाच्या पुढे
अकोला, चंद्रपूर, वर्धा, वाशीम, जळगावमध्ये पारा ४२ अंशाच्या पुढे
राज्यात किमान तापमानातही लक्षणीय वाढ झाल्याने रात्रीचा गारवा ओसरला
पश्चिम महाराष्ट्रासह विदर्भ, मराठवाड्यात काही ठिकाणी हलक्या सरींची शक्यता