Pune Weather : पुण्यात एप्रिलमध्ये उष्णतेच्या लाटांची मालिका, हवेतील आर्द्रतेमुळे मे महिना ठरला त्रासदायक

प्रतिनिधी, पुणे : वातावरणातील घडामोडींमुळे दहा वर्षांतील सर्वाधिक रखरखीत, तापदायक उन्हाचा एप्रिलमध्ये अनुभव घेतल्यानंतर पुण्यासाठी मे महिना उकाड्याने हैराण करणारा ठरला. मे महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात पावसाने हजेरी लावल्याने काही दिवस सुसह्य झाले, तरी गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा किमान तापमानात वाढ होऊन रात्रीचा उकाडा वाढला होता. हवेतील आर्द्रतेमुळे उष्णतेची लाट नसतानाही पुणेकरांसाठी उकाडा असह्य ठरला.

एप्रिलमध्ये उष्णतेच्या लाटांची मालिका

एप्रिल महिना म्हणजे कडक उन्हाळा असे समीकरण बनले असताना गेल्या वर्षी पुणेकरांनी उन्हाळ्याची तीव्रता अनुभवली नव्हती. गेल्या वर्षी एप्रिलमध्ये तीन वेळाच पारा चाळीस अंशाच्या पुढे गेला होता, यंदा मात्र गेल्या दहा वर्षातील सर्वाधिक उन्हाची तीव्रता नोंदवली गेली. संपूर्ण महिना कमाल तापमान सरासरीपेक्षा जास्त होते. मध्यवर्ती भागात दोन आठवडे तापमान ४० अंशाच्या पुढे होते.Pune Crime : राज्य उत्पादन शुल्क विभागाची मोठी कारवाई; पुण्यातील आणखी ६६ पब, बारला ठोकले टाळे

कोरेगाव पार्क, हडपसर, लोहगाव, तळेगावसह काही भागांमध्ये ४१ ते ४३ अंश सेल्सिअसच्यामध्ये तापमान नोंदवले गेले. उष्णतेची लाट लांबल्याने दिवसभर उन्हाचे चटके आणि रस्त्यांवर गरम हवेचा नागरिकांनी सामना केला. गत वर्षीत ४६ मिलीमीटर पाऊस पडला होता, गारपीटही झाली होती. या वर्षी एप्रिलमध्ये पाऊस पडला नाही.

उकाड्याने हैराण पण पावसाने काहीसा दिलासा

मे महिन्याच्या सुरुवातीला पुणेकरांनी वैशाख वणव्याचा अनुभव घेतला. आठवडाभर तापमानाचा पारा चाळीस अंशांजवळ रेंगाळला. हवेतील वाढलेली आद्रर्ता आणि किमान तापमानातही वाढ झाल्यामुळे दिवसाबरोबरच रात्रीही उकाड्याने पुणेकर हैराण झाले होते. गेल्या वर्षीच्या तुलनेत रात्रीचे तापमानही जास्त नोंदवले गेले.

या महिन्यात काही दिवस किमान तापमान २६ अंशापर्यंत पोहोचल्याने एरवी सकाळ अनुभवायला मिळणाऱ्या आल्हाददायक वातावरणाऐवजी घामाच्या धारांमुळे नागरिक वैतागले. मे महिन्याच्या पंधरावड्यानंतर आठवडाभर पावसाने हजेरी लावल्याने नागरिकांची काही दिवस असह्य वातावरणापासून सुटका झाली. गेल्या वर्षी मे महिन्यात पाऊस पडलाच नव्हता, यंदा मात्र सरासरीपेक्षा जास्त पडल्याने महिनाभरात १०८ मिलीमीटर पावसाची नोंद झाली.

पुढील दोन दिवस आकाश अंशत: ढगाळ

पुणेकरांना मान्सूनचे वेध लागले असताना, गेल्या चार दिवसांपासून उन्हाची तीव्रता पुन्हा वाढली आहे. कमाल आणि किमान तापमानातही वाढ झाली आहे. गुरुवारी शहरात दिवसभरात कमाल ३६.५ आणि २४.४ अंश सेल्सिअस किमान तापमान नोंदवले गेले. इंदापूरमध्ये ४०.१ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. पुढील दोन दिवस तापमान स्थिर राहणार असून, संध्याकाळनंतर आकाश अंशत: ढगाळ राहील, असा अंदाज हवामानशास्त्र विभागाने व्यक्त केला आहे.

गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा एप्रिल महिन्यातील उन्हाळा अधिक तीव्र, तर मे महिना हवेतील आर्द्रता वाढल्याने उकड्यामुळे असह्य ठरला. सकाळी १० ते दुपारी चार या वेळेत आर्द्रता अधिक होती, त्यामुळे उष्णतेची लाट नसतानाही गरम वाटत होते. रात्रीचे तापमान सरासरीपेक्षा जास्त नोंदवले गेले. उकाडा अधिक जाणवला. त्यामुळे रात्री घरात काहीशी घुसमट होत असल्याचा अनुभवही अनेकांनी घेतला. गेल्या आठवड्यात झालेल्या रोज सायंकाळी पडलेल्या पावसामुळे नागरिकांना दिलासा मिळाला.

– डॉ. अनुपम कश्यपी, हवामानशास्त्रज्ञ, भारतीय हवामानशास्त्र विभाग