औंध रस्त्यावरील ब्रेमेन चौकातून सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाकडे येणाऱ्या दुचाकी, तीनचाकी व चारचाकी वाहने आचार्य आनंदऋषीजी चौकातून डावीकडे वळून विद्यापीठाच्या आतील रस्त्याने ‘व्हॅमनीकॉम’च्या मुख्य प्रवेशद्वारातून गणेशखिंड रस्त्यावर येतील. तर, पीएमपी बससह अन्य सर्व जड वाहनांना ब्रेमेन चौकातून डावीकडे वळून (औंध रस्ता) जयकर पथावरून आंबेडकर चौक – साई चौक – सिंफनी चौक (रेंजहिल) येथून कृषी महाविद्यालयाकडील रस्त्याने न. ता. वाडीकडे जातील. तर, पुणे स्टेशन, नगर रस्त्याकडे जाणाऱ्या वाहनांनी ब्रेमेन चौक येथून डॉ. आंबेडकर चौक – बोपोडी चौकमार्गे मुंबई-पुणे रस्त्याने इच्छितस्थळी जावे.
भाऊसाहेब खुडे चौकातून (सिमला ऑफिस) सीओईपी हॉस्टेलच्या बाजूने स. गो. बर्वे चौकाकडे जाण्यासाठी प्रवेश बंद राहील. मात्र, त्याऐवजी संचेती हॉस्पिटल समोरून उजवीकडे वळून स. गो. बर्वे चौकात जावे लागले; तसेच संचेती हॉस्पिटलसमोरील ग्रेड सेपरेटर दररोज रात्री १० ते सकाळी सात या वेळेत बंद राहणार आहे.
पोल्ट्री फार्म चौक ते रेंजहिल्स रस्ता बंद
पुणे-मुंबई महामार्गावरील पोल्ट्री फार्म चौकातून रेल्वे भुयारी मार्गाने रेंजहिल्सकडे जाणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहनांना प्रवेश बंद राहणार आहे. विद्यापीठ, औंध, बाणेरकडून येणारी वाहने रेंजहिल्समार्गे पोल्ट्री फार्म चौकातून पुढे मार्गस्थ होतील. हिंजवडी, सांगवी परिसरातून सेनापती बापट रस्तामार्गे जाणाऱ्या बस नेहमीप्रमाणे धावतील. औंधकडून सेनापती बापट रस्तामार्गे जाणाऱ्या बस परिहार चौकातून बाणेर रस्त्याने मार्गस्थ होतील. शिवाजीनगरकडून औंध, बाणेर आणि पाषाणकडे जाण्याच्या वाहतुकीत कोणताही बदल करण्यात आलेला नाही.
मेट्रो स्थानकांच्या कामांची टप्प्याटप्प्याने सुरुवात केल्यास साधारण नऊ महिन्यांचा कालावधी लागू शकतो. मात्र, एकाच वेळी कामे सुरू केल्याने तीन ते चार महिन्यांत पूर्ण होऊ शकेल.
– मनोज पाटील, अतिरिक्त पोलिस आयुक्त