मी केलेल्या वक्तव्याचा विपर्यास करून राजकारण करण्यासाठी वापर केला जात आहे. मला जी माहिती पोलिसांनी दिली त्याच आधारावर मी पत्रकार परिषदेत बोललो, अशी प्रतिक्रिया गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी दिली आहे. मी देखील एका मुलीचा बाप आहे. महिलांच्या संवेदना जपण्याची, त्यांचा मान राखण्याची शिकवण आम्हाला बाळासाहेबांनी दिलेली आहे, असंही त्यांनी टीव्ही9 मराठीला दिलेल्या मुलाखतीत बोलताना म्हंटलं आहे.
स्वारगेट अत्याचार प्रकरणात गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी पत्रकार परिषदेत बोलताना पीडित तरुणीने प्रतिकार केला नाही, स्ट्रगल केलं नाही म्हणून गुन्हा घडण्यास मदत झाली असल्याचं वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. त्यानंतर विरोधी पक्षाकडून त्यांच्यावर जोरदार टीका देखील झाली. या संपूर्ण प्रकरणावर आज मंत्री कदम यांनी टीव्ही9 मराठीला मुलाखत देत, आपण केलेल्या वक्तव्याचा विपर्यास विरोधकांनी राजकारणासाठी केला असल्याचं म्हंटलं आहे. तसंच पुण्यातील एवढ्या वर्दळीच्या ठिकाणी अशी घटना घडत असताना कोणीही मदतीला का आलं नाही असा सवाल मी पोलिसांना विचारल्यावर त्यांनी मला जी माहिती दिली त्यावर मी बोललो. आम्ही कधीच महिलांवरील अत्याचार खपवून घेणार नाही. विरोधक हे या संपूर्ण घटनेचंच राजकरण करत आहेत, असंही कदम म्हणाले.