Pune RTO: ५२ वाहनचालकांचा सहा महिने परवाना निलंबित; ही एक चूक नडली, तुम्हीही असंच काहीसं करताय का?

प्रतिनिधी, पुणे : कल्याणीनगर अपघात प्रकरणानंतर पुणे प्रादेशिक परिवहन विभागाने सुरू केलेल्या तपासणी मोहिमेत विना नोंदणी केलेली ११ वाहने आढळली आहेत. दोन अल्पवयीन मुले गाडी चालविताना सापडली असून, मद्यपान करून गाडी चालविताना ५२ जणांवर कारवाई करण्यात आली आहे. या मद्यपींचा सहा महिने वाहन परवाना रद्द केला जाणार आहे.

कल्याणीनगर अपघातात अल्पवयीन मुलाने चालविलेल्या पोर्श या कारची नोंदणी केलेली नव्हती. ती बंगळुरू येथील वाहन विक्रेत्यांकडून तात्पुरती नोंदणी करून आणण्यात आली होती; पण ती रस्त्यावर आणण्यास परवानगी नव्हती; तरीही ती रस्त्यावर आणून अपघात केला. त्यानंतर ‘पुणे आरटीओ’ने शहरात विना नोंदणी रस्त्यावर आलेल्या वाहनांची शोध मोहीम सुरू केली होती. वाहन चालविणाऱ्या अल्पवयीन मुलांवर लक्ष ठेवण्यात येत होते. ‘आरटीओ’च्या वायुवेग पथकांनी २२ ते ३१ मे दरम्यान केलेल्या तपासणीत शहरात विना नोंदणी न करता रस्त्यावर आणलेली ११ वाहने आढळली आहेत. विना नोंदणी बाहेर आलेल्या सर्व दुचाकी असून, त्या कोणत्या वाहन विक्रेत्यांकडून आली, याची माहिती काढण्यात आली. त्या वाहन विक्रेत्यांना त्यांचे ‘ट्रेड लायसन्स’ का रद्द करू नये, अशा नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. नोंदणी न करता बाहेर आलेल्या दुचाकी शहराच्या बाहेरील वाहन विक्रेत्यांकडून देण्यात आल्याचे दिसून आले आहे, असे ‘आरटीओ’च्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

सहा महिने वाहन परवाना रद्द केला जाणार

गेल्या नऊ दिवसांत ‘आरटीओ’च्या पथकांनी मद्यपान करून वाहन चालविणाऱ्यांवरही कारवाई केली आहे. या नऊ दिवसांत ५२ जण मद्यपान करून वाहन चालविताना आढळले आहेत. त्यांच्यावर ‘ड्रंक अँड ड्राइव्ह’ची कारवाई करून त्यांना न्यायालयात पाठविले आहे. त्यांचा वाहन परवाना सहा महिन्यांसाठी निलंबित केला जाणार आहे.

वाहन चालविताना दोन अल्पवयीनांना पकडले

‘पुणे आरटीओ’च्या वायुवेग पथकाने शहराच्या वेगवेगळ्या भागांत केलेल्या तपासणीत दोन अल्पवयीन मुले दुचाकी चालविताना आढळली आहेत. त्यांच्यावर कारवाई करून त्यांना न्यायालयात हजर करण्यात आले आहे.

सोमवारी अंतिम अहवालाची शक्यता

पोर्श कार अपघात प्रकरणात प्रादेशिक परिवहन विभागाचा अंतिम अहवाल सोमवारपर्यंत येण्याची शक्यता आहे. पोर्श कार कंपनीचे अधिकारी व ‘आरटीओ’चे अधिकारी एकत्रित पाहणी केल्यानंतर हा अहवाल तयार करण्यात येत आहे. त्यातून अनेक गोष्टी स्पष्ट होण्याची शक्यता आहे.

गेल्या काही दिवसांपासून ‘आरटीओ’च्या वायुवेग पथकांना मद्यपान करून वाहन चालविणे, विना नोंदणी वाहन चालविणे आणि अल्पवयीन मुलांना वाहन चालविताना दिसून आल्यास कारवाईचे आदेश दिले होते. त्यानुसार कारवाई करण्यात आली आहे.- संजीव भोर, आरटीओ, पुणे