पुणे बलात्कार प्रकरण : ‘त्या चार बसमध्ये बेडशीट, रग, साड्या अन् शेकडो कंडोम..’ ठाकरे गटाकडून बस स्थानकाची तोडफोड

पुण्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे.  पुण्यातील स्वारगेट बसस्थानकात  शिवशाही बसमध्ये एका तरुणीवर बलात्कार झाला आहे. सोमवारी पहाटेच्या सुमारास ही घटना घडली आहे. या घटनेनं खळबळ उडाली आहे.  पीडित तरुणी पुण्याहून फलटणला जाण्यासाठी स्वारगेट बस स्थानकावर आली होती, त्यावेळी ही घटना घडली. या प्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून, घटनेचा तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे.

दरम्यान या प्रकरणानंतर शिवसेना ठाकरे गट चांगलाच आक्रमक झाला आहे. शिवसेना ठाकरे गटाचे नेते वसंत मोरे आणि कार्यकर्त्यांकडून स्वारगेट बस स्थानकात तोडफोड करण्यात आली आहे. शिवसेना ठाकरे गटानं  बस आगारातील सुरक्षा सरक्षकांचं कार्यालय फोडलं आहे. या प्रकरणावर बोलताना वसंत मोरे यांनी गंभीर आरोप केला आहे.

नेमकं काय म्हणाले वसंत मोरे?   

मागच्या बाजूला मी आता तिथे जाऊन आलो.  त्या ठिकाणी मी पाहिलं चार शिवशाही बस उभ्या आहेत.  चार एसटीचं या लोकांनी लॉजिंग केलं आहे. याचा अर्थ असा होतो,  सुरक्षा रक्षकांच्या अंडर, त्यांच्या उपस्थितीमध्ये इथे रोज बलात्कार होतात. तुम्ही जर स्वत: जाऊन मीडियानं या सर्व गोष्टी पाहिल्या तर एसटीमध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात कंडोम पडल्यांच दिसून येईल. या संपूर्ण एसटी आगाराला कंपाऊंड आहे, मात्र आत जाऊन पाहा तिथे तुम्हाला शेकडोने कंडोम पडल्याचं दिसून येईल. आम्ही आता तिथे जाऊ आलो आहोत. याचा अर्थ असे प्रकार इथे दररोज  होत आहेत. याच्यामध्ये या लोकांचा हात आहे. यामध्ये सुरक्षा कर्मचाऱ्यांचा हात आहे, सुरक्षा कर्मचारी नेमकं काय करतात? बलात्कार घडला तेव्हा गाडी सुरक्षा केबीनच्या समोर उभी होती. त्या गाडीमध्ये आता कोणाला जाऊ देत नाहीत, पण ती गाडी इथेच उभी होती. त्यामुळे सुरक्षा रक्षकाला इथे  बसण्याचा अधिकारच नाही. त्या चार गाड्यांमध्ये तुम्ही जाऊन पाहा तिथे बेडशीट, रग महिला भगिनींच्या साड्या आणि कंडोम तुम्हाला दिसून येतील असा खळबळजनक आरोप यावेळी वसंत मोरे यांनी केला आहे.

(सूचना: ही बातमी विविध स्त्रोतांमधून एकत्रित करण्यात आलेली आहे. आमच्याकडून यामध्ये कोणतेही संपादन केलेले नाही. मूळ स्त्रोतांची माहिती आणि मालकी कायम आहे.)