Pune rape case : आरोपी दत्ता गाडेचा ‘तो’ फोटो व्हायरल; पोलिसांचं टेन्शन वाढलं

गेल्या आठवड्यात पुण्यात एक धक्कादायक घटना घडली होती. स्वारगेट बसस्थानकात उभ्या असलेल्या बसमध्ये एका तरुणीवर बलात्कार करण्यात आला. या घटनेनं राज्यात खळबळ उडाली. दत्तात्रय गाडे असं या प्रकरणातील आरोपीचं नाव आहे, तो पुणे जिल्ह्यातल्या शिरूर तालुक्यातील गुणा गावचा रहिवासी आहे. घटना घडल्यानंतर तो तीन दिवस फरार होता. त्याच्या शोधासाठी पोलिसांनी तब्बल तेरा पथकांची नियुक्ती केली होती. अखेर त्याच्याच गावातून त्याला अटक करण्यात आली. न्यायालयानं त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे.

दरम्यान या प्रकरणात आता मोठी अपडेट समोर आली आहे, आरोपीच्या मोबाईलचा शोध पोलिसांकडून घेतला जात आहे. त्यासाठी पुन्हा एकदा दत्ता गाडे याला त्याच्या गावी गुणा येथे आणण्यात आले होते. आरोपीने मोबाईल शेतशिवारात पुरून ठेवल्याचा पोलिसांना संशय आहे, तर आपला मोबाईल हरवल्याचा दावा आरोपीकडून करण्यात येत आहे.

ही घटना घडल्यानंतर आरोपी दत्ता गाडे हा जवळपास तीन दिवस फरार होता. तो या काळात जवळपास तीस ठिकाणी लपला होता. या सर्व ठिकाणी पोलिसांनी आज तपास केला. फरारी असताना तो गावातील 7 व्यक्तींना भेटला होता, त्या व्यक्तीचा पोलिसांनी आज जबाब नोंदवला आहे. त्यामध्ये एका ठिकाणी तो गॅरेजमध्ये गेला होता, एका ओळखीच्या व्यक्तीला जेवण मागितले, एका ठिकाणी पाणी पिला असे तो 7 वेगळ्या वेगळ्या लोकांना भेटला या सर्व लोकांचे पोलिसांनी आज जबाब नोंदवले आहेत.  आरोपी दत्ता गाडेच्या घराची देखील पोलिसांनी झाडाझडती घेतली आहे.

दरम्यान दोन दिवसांपूर्वी पोलिसांचा गणवेश घातलेला दत्ता गाडे याचा एक फोटो व्हायरल झाला होता. या फोटोबाबत पोलिसांनी त्याच्याकडे चौकशी केली असता हा फोटो रामोजी फिल्म सिटीमधील असल्याचा दावा त्याने केला आहे. मात्र ही माहिती खोटी असल्याचं पोलिसांकडून सांगण्यात येत आहे.  आज पोलिसांनी जवळपास 150 एकर परिसरात दत्ता गाडे ज्या ज्या ठिकाणी लपला होता त्या त्या ठिकाणी मोबाईलचा शोध घेतला. गुणाट गावातील शेतशिवारात जवळपास 30 वेगवेगळ्या ठिकाणी जागा बदलून दत्ता गाडे लपला होता, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.

(सूचना: ही बातमी विविध स्त्रोतांमधून एकत्रित करण्यात आलेली आहे. आमच्याकडून यामध्ये कोणतेही संपादन केलेले नाही. मूळ स्त्रोतांची माहिती आणि मालकी कायम आहे.)