Pune rape case : आरोपी दत्ता गाडेबद्दल गुणा गावातील गावकऱ्यांना काय वाटतं, पहिल्यांदाच आणखी एक बाजू समोर

गेल्या आठवड्यामध्ये पुण्यातील स्वारगेट बसस्थानकात उभ्या असलेल्या एका बसमध्ये तरुणीवर अत्याचार करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली होती.  या घटनेनं राज्यभरात खळबळ उडाली. दत्तात्रय गाडे असं या प्रकरणातील आरोपीचं नाव आहे, तो पुणे जिल्ह्यातल्या शिरूर तालुक्यातील गुणा गावचा रहिवासी आहे. या घटनेनंतर आरोपी फरार झाला होता. त्याच्या शोधासाठी पोलिसांनी तब्बल तेरा पथक तैनात केली होती, आरोपी हा त्याच्याच गावात लपून बसल्याचा पोलिसांना संशय होता, गुणा गावाला छावणीचं स्वरुप प्राप्त झालं होतं. अखेर पोलिसांनी त्याच्याच गावातून आरोपीच्या मुसक्या आवळल्या, न्यायालयानं आरोपीला पोलीस कोठडी सुनावणली आहे. दरम्यान आता या प्रकरणात आरोपींच्या नातवाईकांकडून वेगवेगळे दावे करण्यात येत आहेत.

या प्रकरणावर बोलताना दत्ता गाडे याच्या भावानं मोठा खुलासा केला आहे. घटनेनंतर तो सापडला नाही, म्हणून  प्रसारमाध्यमांनी दत्ता गाडे हा फरार असल्याच्या बातम्या चालवल्या, त्यामुळे गावकऱ्यांना देखील दत्ता हाच आरोपी आहे, असं वाटत असल्याचं त्याच्या भावाने म्हटलं आहे. पुढे बोलताना तो म्हणाला की, गावकऱ्यांकडून आम्हाला हिन वागणूक मिळत आहे, मिडीयानं दत्ताची बाजू देखील मांडली पाहिजे, अशी मागणी त्याने केली आहे.

दरम्यान दत्ता भाजी विकून येत होता. न्याय व्यवस्थेवर आमचा विश्वास आहे. प्रकरणाची सखोल चौकशी व्हायला पाहिजे. पीडितेला पण न्याय मिळायला पाहिजे. मीडियानं पण दुसरी बाजू दाखवावी, दत्ता भाजीपाला विक्रीचा व्यवसाय करतो, दत्ता जर दोषी असेल तर त्याच्यावरही कारवाई व्हावी असंही आरोपीच्या भावानं म्हटलं आहे.

दत्ता गाडेच्या पत्नीची प्रतिक्रिया 

दरम्यान या प्रकरणावर बोलताना दत्ता गाडेच्या पत्नीकडून देखील मोठा दावा करण्यात आला आहे. तो भाजी विकण्यासाठी गुलटेकडीवर गेला होता. त्यानंतर तो भाजी विक्री करून घराकडे परत येण्यासाठी स्वारगेट बसस्थानकात आला होता. जे काही घडलं आहे ते संमतीनं घडलं आहे, आमचा न्याय व्यवस्थेवर पूर्ण विश्वास आहे, असं त्याच्या पत्नीनं म्हटलं आहे.

(सूचना: ही बातमी विविध स्त्रोतांमधून एकत्रित करण्यात आलेली आहे. आमच्याकडून यामध्ये कोणतेही संपादन केलेले नाही. मूळ स्त्रोतांची माहिती आणि मालकी कायम आहे.)