Pune Rain Update : पुण्यावर वादळाचे ढग! मुसळधार पावसाने पुण्याला झोडपले, पुढील दोन दिवस तापमान स्थिर राहणार

प्रतिनिधी, पुणे : शहरासह उपनगरांमध्ये दुपारनंतर पडलेल्या मुसळधार आणि वादळी पावसाने पुण्याला झोडपले. सलग दोन-अडीच तास पडलेल्या पावसामुळे शहराच्या वेगवेगळ्या भागात रस्त्यावर गुडघाभर पाणी साठले, तर अनेक सोसायट्यांच्या पार्किंगमध्येही पाणी शिरले. वडगाव शेरी भागात रात्री साडेआठपर्यंत १११ मिलीमीटर आणि कात्रजमध्ये ११३ मिलीमीटर पावसाची नोंद झाली. रात्री उशिरापर्यंत पावसाच्या हलक्या सरी पडत होत्या.

सकाळपासूनच उकाडा


शहरात मंगळवारी सकाळपासूनच उकाडा जाणवत होता. दुपारी दोनपर्यंत उन्हाचा तडाखा आणि घामाच्या धारांनी नागरिक हैराण झाले होते. शहरात दिवसभरात कमाल ३६.६ आणि किमान २४.१ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. दुपारी चारनंतर वातावरण बदलले आणि ढग दाटून आले. वादळीवाऱ्यासह सुरुवातीला हलक्या सरींनी सुरू झालेल्या पावसाचा जोर वाढत गेला. ढगांच्या गडगडाटासह शहराच्या सर्व भागांत मुसळधार पाऊस पडला. कामासाठी बाहेर पडलेल्या, ऑफिसमधून घराकडे निघालेल्या नागरिकांची धांदल उडाली.

पाण्याचे मोठे लोट

रहदारीच्या रस्त्यांवर, मोठ्या चौकांमध्ये पाण्याचे लोट वाहत होते. अनेक ठिकाणी गुडघाभर उंचीच्या पाण्यातून वाट काढत वाहनचालकांना गाडी चालवावी लागली. पाण्यातून जाताना काहींच्या गाड्या बंदही पडल्या. रात्री आठ वाजले, तरी पावसाचा जोर कमी झाला नव्हता. मध्यवर्ती पुण्यापेक्षाही उपनगरांमध्ये प्रामुख्याने कोरेगाव पार्क, बंडगार्डन, संगमवाडी, येरवडा, वडगाव शेरी, धानोरी, हडपसर, कात्रज आदी भागांत अधिक पाऊस पडला. लोणावळ्यासह पुणे जिल्ह्यातही पावसाने जोरदार हजेरी लावली. पुढील दोन दिवस शहरात तापमान स्थिर राहणार असून, संध्याकाळनंतर ढगांच्या गडगडाटासह पाऊस पडणार असल्याची शक्यता भारतीय हवामानशास्त्र विभागाने (आयएमडी) व्यक्त केली आहे.

वीज पडून महिलेचा मृत्यू

राजगुरुनगर : खेड तालुक्यातील तिन्हेवाडी भागात शेतात भुईमूग काढायला गेलेल्या महिलेचा अंगावर वीज पडून मंगळवारी मृत्यू झाला. मंगल रंगनाथ आरूडे (वय ४०) असे मृत्यू पावलेल्या महिलेचे नाव आहे. गावातील शेंडेवस्ती परिसरात दुपारी वादळी वाऱ्यासह पाऊस पडला. मंगल आरुडे कुटुंबातील सदस्यांसह शेतात भुईमुग काढायला गेल्या असता, त्यांच्या अंगावर वीज कोसळली. त्यांचा जागीच मृत्यू झाला. पोलिस संदीप लोहकरे यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला.

विविध भागांतील पाऊस (मिलीमीटरमध्ये)

कात्रज ११३.६

वडगाव शेरी १११.५

मगरपट्टा २३

कोरेगाव पार्क २२.५

शिवाजीनगर १७.१

चिंचवड १४

कोथरूड ११.२

खडकवासला ११.२

एनडीए परिसर ४.५

(स्रोत : भारतीय हवामानशास्त्र विभाग, आशय मेजरमेंट्स)