नागरिकांची गैरसोय
गेल्या आठवड्यात सायंकाळी दोन ते तीन तास झालेल्या जोरदार पावसामुळे शहराच्या सर्वच भागांत पाणीच पाणी साठले होते. खराडीपासून ते नरवीर तानाजी मालुसरे रस्त्यापर्यंत (सिंहगड रोड) आणि कात्रजपासून ते बाणेरपर्यंत सर्व रस्त्यांना नदीचे स्वरूप प्राप्त झाले होते. त्यामुळे ठिकठिकाणी झालेल्या कोंडीमुळे नागरिकांची प्रचंड गैरसोय झाली. लोकसभा निवडणुकांचा प्रचार आणि त्याच्या आचारसंहितेच्या कालावधीत पावसाळापूर्व कामांकडे कोणाचे लक्ष नसल्यानेच शहरावर अशी परिस्थिती ओढवल्याचे स्पष्ट दिसून येते आहे.
पालिकेचे दावे उघड
पावसाळ्यापूर्वी रस्ते खोदाई थांबणे अपेक्षित असताना, अजूनही शहरातील सर्व रस्ते पूर्वपदावर आलेले नाहीत. पावसाळी गटारांची स्वच्छता केल्याचे दावे पहिल्या एक-दोन दिवसांतच पूर्ण फोल ठरले आहेत, हे सर्व पुण्याने अनुभवले आहे. तसेच, शहराच्या उपनगरांत नाल्यांवरील अतिक्रमण आणि नाले वळविले गेल्याने अनेक घरांमध्ये पाणी शिरल्याचे प्रकार नव्याने उजेडात येत आहेत. पूर्वी केवळ शहराच्या सखल भागांत पाणी साठायचे; पण अलीकडे संपूर्ण शहरच एखाद-दुसऱ्या जोराच्या पावसात पाण्यात जात असल्याचा विचित्र प्रकार घडताना दिसतो.
उपनगरांत समस्या
पुण्यात एकाचवेळी अनेक ठिकाणी पायाभूत सुविधांची कामे सुरू असून ही कामे पूर्ण करताना, पाण्याचा निचरा होण्यासाठी योग्य दक्षता घेतली गेली नसल्याचे वारंवार अधोरेखित होते आहे. पाऊस पडून गेल्यानंतर थोड्यावेळात सर्व पाणी वाहून जाणे गरजेचे आहे. मात्र, काही ठिकाणी दोन-तीन तास पाणी साचून राहात असल्याचे समोर येत आहे. विशेषत: उपनगरांमध्ये ही समस्या अधिक तीव्रतेने जाणवत असून, पुणे-नगर रस्ता, सिहंगड रस्ता अशा ठिकाणी गुडघाभर किंवा त्याहून अधिक पाण्यातून वाट काढण्याची वेळ पुणेकरांवर आली आहे.
मटा भूमिका
‘प्रशासन उत्तरे देईल का?’
मार्च २०२२पासून पुण्याचा सर्व कारभार ‘प्रशासक’ म्हणून अधिकाऱ्यांच्या हाती आहे. मार्च २०२४मध्ये नवे आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले यांनी कार्यभार स्वीकारला अन् लगेच आचारसंहिता जाहीर झाली. मात्र, पावसाळापूर्व कामांचा आढावा, नालेसफाई, रस्ते खोदाई बंद करून रस्त्यांची डागडुजी या कामांना कोणताही अडसर नव्हता. मग, आयुक्तांनी पावसाळ्याच्या आधी घेतलेल्या बैठकांमध्ये नेमका काय आढावा घेतला? अनेक पुणेकर पाण्यात अडकले असताना, महापालिकेची आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा कुठे होती? दर वेळी जोराचा पाऊस आल्यानंतर ‘कमी वेळात जास्त पाऊस’ हे कारण पुणेकरांनी किती दिवस ऐकायचे? याची उत्तरे आयुक्त साहेब तुम्ही द्याल का, असा सर्वसामान्यांचा प्रश्न आहे. देशातील आठव्या महानगराची ही अवस्था सुधारण्यासाठी आता ‘पुरे झाला हा प्रशासकीय कारभार’ असे म्हणण्याची वेळ आली आहे.