Pune Porsche Car Accident: पैशांचा माज अजूनही गेला नाही! अगरवाल बाप-लेकाकडून उडवाउडवीची उत्तरे, तपासात असहकार्य

प्रतिनिधी, पुणेकल्याणीनगर अपघात प्रकरणात कारचालक अल्पवयीन मुलाच्या बापाने व आजोबाने चालकाला डांबून ठेवलेल्या बंगल्यातील ‘सीसीटीव्ही’ चित्रीकरणात छेडछाड केल्याचे प्रथमदर्शनी दिसत असून, त्याबाबत आरोपी तपासात सहकार्य करत नाहीत, तसेच त्यांनी चालकाचा मोबाइल फोन कुठे ठेवला याबाबत उडवाउडवीची उत्तरे देत असल्याची माहिती पोलिसांनी मंगळवारी न्यायालयात दिली. त्यानंतर न्यायालयाने आरोपी बापलेकाला ३१ मे पर्यंत पोलिस कोठडी सुनावली.

‘पोर्श’ कार भरधाव चालवून तरुण-तरुणीच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या अल्पवयीन मुलाचा गुन्हा आपल्या अंगावर घेण्यासाठी या चालकाचे अपहरण करून त्याचा मोबाइल फोन काढून घेत धमकावल्याप्रकरणी सुरेंद्रकुमार ब्रह्मादत्ता अगरवाल (वय ७७) आणि विशाल सुरेंद्रकुमार अगरवाल (वय ५०, दोघे रा. बंगला क्रमांक एक, ब्रह्मा सनसिटी, वडगाव शेरी) यांना गुन्हे शाखेने अटक केली आहे. त्यापैकी सुरेंद्रकुमार याच्या पोलिस कोठडीची मुदत मंगळवारी संपली, तर अल्पवयीन मुलाला कार चालविण्यास दिल्याप्रकरणी न्यायालयीन कोठडीत असलेल्या विशालला या गुन्ह्यात सोमवारी रात्री अटक करण्यात आली. या दोघांनाही मंगळवारी प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी ए. ए. पांडे यांच्या न्यायालयात हजर करण्यात आले. त्यावेळी पोलिसांनी गुन्ह्याच्या तपासाबाबतची माहिती न्यायालयात दिली.
Pune Car Accident: ‘कोण आहे रे तिकडे….’; जेव्हा गृहमंत्री गोपीनाथ मुंडे यांनी स्वतः पबमध्ये घुसून टाकली होती रेड!

अपहरणासाठी वापरलेली कार जप्त

या प्रकरणी अगरवाल कुटुंबियांचा चालक गंगाधर शिवराज हेरीक्रूब (वय ४२) यांनी तक्रार दिली आहे. अपघाताच्या घटनेनंतर आरोपी सुरेंद्रकुमार व विशालने चालकाचे अपहरण करण्यासाठी वापरलेली कार जप्त करण्यात आली आहे. याशिवाय आरोपींनी चालकाला धमकावून त्याचा मोबाइलही काढून घेतला होता. त्याबाबत विचारणा केली असता, ते उडवाउडवीची उत्तरे देत आहेत. हा मोबाइल जप्त करायचा आहे, तसेच आरोपींना आणखी कोणी माहिती दिली आहे का, याबाबत तपास करायचा आहे, असे खंडणी विरोधी पथकाचे वरिष्ठ निरीक्षक व तपास अधिकारी प्रताप मानकर यांनी न्यायालयात सांगितले.
Pune Car Accident: सगळ्यांना उघडं पाडणार! अटकेनंतर ससूनच्या डॉक्टरची धमकी; पोर्शे प्रकरणात बडे मासे अडकणार?

बाप-लेकाकडे एकत्रित तपास

या गुन्ह्याची व्याप्ती मोठी असून, त्याचा सखोल तपास गरजेचा आहे. या गुन्ह्यात विशाल अगरवालला सोमवारी अटक करण्यात आली असून, या दोघांकडे एकत्रित तपास करायचा आहे, तसेच इतर व्यक्तींचा सहभाग निष्पन्न करायचा आहे. त्यासाठी आरोपींना पोलिस कोठडी देण्यात यावी, असा युक्तिवाद सरकारी वकील निलेश लडकत यांनी केला. बचाव पक्षातर्फे अॅड. प्रशांत पाटील यांनी बाजू मांडली.

अशी आहे चालकाची तक्रार

कल्याणीनगर अपघाताच्या घटनेनंतर येरवडा पोलिस ठाण्यातून चालक घरी जात असताना सुरेंद्र अगरवाल याने धमकी देऊन कारमध्ये बसवून त्यांच्या ब्रह्मा सनसिटी बंगल्यावर नेले. तिथे सुरेंद्र अगरवाल व विशाल अगरवाल यांनी संगनमत करून चालकाला धमकावून त्याचा मोबाइल फोन काढून घेतला, तसेच त्यांच्या बंगल्यात बेकायदा डांबून ठेवले. अपघात झाला, त्यावेळी कार चालवित असल्याची खोटी कबुली देण्यासाठी दबाव टाकला, असे चालकाने तक्रारीत म्हटले आहे.