ससूनच्या न्यायवैद्यक विभागाचा प्रमुख डॉ. अजय तावरे, आपत्कालीन विभागाचा मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. श्रीहरी हाळनोर याच्या सांगण्यावरूनच घटकांबळे याने हे पैसे स्वीकारल्याचे तपासात निष्पन्न झाल्याची माहिती सूत्रांनी दिली.
तीन लाख जप्त
कल्याणीनगर येथे झालेल्या अपघातप्रकरणी अल्पवयीन मुलाला वाचवण्यासाठी हा कट शिजवण्यासाठी मोठा आर्थिक व्यवहार झाल्याचे उघडकीस आले आहे. पोलिसांनी आतापर्यंत या प्रकरणात तीन लाख रुपये जप्त केले आहेत. त्यापैकी डॉ. हाळनोरकडून अडीच लाख रुपये, तर घटकांबळेकडून उर्वरित ५० हजार रुपये जप्त करण्यात आले आहेत. अपघाताच्या घटनेनंतर अल्पवयीन मुलाला बाल न्याय मंडळात हजर करण्यात आले आणि त्याच दिवशी या आर्थिक रकमेची देवाणघेवाण झाल्याचे पोलिसांच्या तपासात निदर्शनास आले आहे.
दुचाकीचा शोध सुरू
बाल न्याय मंडळाच्या परिसरात घटकांबळेने मकानदारकडून ही रक्कम स्वीकारल्याचे परिसरातील ‘सीसीटीव्ही कॅमेऱ्या’त कैद झाले आहे. पोलिसांनी हे सीसीटीव्ही चित्रीकरण ताब्यात घेतले आहे. मकानदार त्याच्या दुचाकीतून पैसे घेऊन आल्याचे निदर्शनास आले असून, या दुचाकीचा पोलिस शोध घेत आहेत, असेही सूत्रांनी सांगितले.
डॉ. तावरेसह चौघांना न्यायालयीन कोठडी
कारचालक अल्पवयीन मुलाच्या रक्ताचा नमुना बदलून पुरावा नष्ट केल्याप्रकरणी आरोपी डॉ. अजय तावरे, डॉ. श्रीहरी हाळनोर, अतुल घटकांबळे, अमर गायकवाड यांना शुक्रवारी विशेष न्यायालयात हजर करण्यात आले. या वेळी पोलिसांनी चौघांच्या पोलिस कोठडीचे हक्क अबाधित ठेवून त्यांना न्यायालयीन कोठडी देण्याची मागणी केली. विशेष न्यायाधीश व्ही. आर. कचरे यांनी ती मान्य केली. त्यानुसार चारही आरोपींची रवानगी येरवडा कारागृहात करण्यात आली आहे. बचाव पक्षातर्फे अॅड. सुधीर शहा, अॅड. हृषीकेश गानू, अॅड. शिवम निंबाळकर, अॅड. राहुल भरेकर यांनी बाजू मांडली. या गुन्ह्यात मुख्य संशयित आरोपी विशाल अगरवाल, शिवानी अगरवाल आणि अश्फाक मकानदार यांना न्यायालयाने यापूर्वीच दहा जूनपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.
वैद्यकीय उपचारांसाठी गायकवाडचा अर्ज
या प्रकरणातील आरोपी अमर गायकवाडला तीव्र मधुमेह, उच्च रक्तदाब आणि श्वसनविकाराचा त्रास होत आहे. त्याला नियमित औषधोपचार मिळावेत, यासाठी त्याच्या वकिलांनी न्यायालयात अर्ज केला आहे.