या गुन्ह्यात आतापर्यंत ससून रुग्णालयाचे न्यायवैद्यक विभागाचा प्रमुख डॉ. अजय तावरे, आपत्कालीन विभागाचा वैद्यकीय अधिकारी डॉ. श्रीहरी हाळनोर, शवविच्छेदन विभागातील शिपाई अतुल घटकांबळे यांना अटक केली आहे. या तिघांनी मुलाच्या रक्ताचे नमुने बदलण्याचे काम केले. अल्पवयीन मुलाची आई आणि त्याचे वडील या दोघांचा या गुन्ह्यात सहभाग आढळून आल्याने त्यांनादेखील याच गुन्ह्यात आता पोलिसांनी अटक केल्याचे पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले.
रक्त नमुना बदलण्याचा प्रकार काय?
कल्याणीनगर अपघात प्रकरणातील अल्पवयीन मुलाच्या रक्ताचे नमुने ससून रुग्णालयात बदलण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला होता. तपासासाठी पोलिसांनी ससून रुग्णालयातील ‘सीसीटीव्ही’त कैद झालेले चित्रीकरण ताब्यात घेतले. त्या वेळी ससून रुग्णालयात रक्त नमुना घेताना संबंधित मुलासह चौघे उपस्थित असल्याचे दिसून आले होते. वैद्यकीय शिक्षण विभागाने नेमलेल्या समितीच्या अहवालात, बदललेले रक्त महिलेचे असल्याचे नमूद केले होते. या पार्श्वभूमीवर शनिवारी शिवानी अगरवालकडे चौकशी केली असता, त्यांनी बदललेले रक्त आपलेच असल्याची कबुली दिल्याचे गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. पोलिसांनी रुग्णालयातील सीसीटीव्ही चित्रीकरण ताब्यात घेतले. तांत्रिक विश्लेषणात शिवानी अगरवालही ससूनमध्ये उपस्थित असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती.
तीन गुन्ह्यांत दहा जण अटकेत
कल्याणीनगर अपघात प्रकरणात आतापर्यंत तीन गुन्हे दाखल करण्यात आले असून, यात दहा जणांना अटक करण्यात आली आहे. त्यात अगरवाल कुटुंबातील चौघांचा समावेश आहे.