Pune News : साथीचे रोग रोखण्यासाठी उपाययोजना राबवण्याचा पालिकेचा प्रयत्न, स्वच्छता राखण्याचे आवाहन

प्रतिनिधी, पिंपरी : हिवताप, डेंग्यू व चिकनगुनिया या कीटकजन्य रोगांच्या साथी उद्भवू नयेत, यासाठी नागरिकांनी काळजी घेण्याचे आवाहन पिंपरी-चिंचवड महापालिकेने केले आहे. या संदर्भात पालिकेच्या आरोग्य वैद्यकीय विभागाने माहिती दिली आहे.

आळा घालणे आवश्यक


हिवताप, डेंग्यू किंवा चिकनगुनिया झालेल्या व्यक्तीला चावलेला डास निरोगी व्यक्तीस चावल्यास त्या व्यक्तीला हिवताप, डेंग्यू किंवा चिकनगुनिया होण्याची शक्यता वाढते. या रोगांचा प्रसार थांबवण्यासाठी ‘ॲनॉफिलस’ व ‘एडिस इजिप्ती’ या डासांच्या उत्पत्तीवर आळा घालणे आवश्यक आहे. डासाची मादी घरात साठलेल्या स्वच्छ पाण्यावर अंडी घालते. या अंड्यातून बाहेर पडणाऱ्या डासांच्या अळ्या त्याच पाण्यात वाढतात. चार-पाच दिवसांनंतर अळ्यांचे कोष तयार होऊन ते पाण्यातच जिवंत राहतात. या कोषातून दोन दिवसांनी डास बाहेर पडतात. अंड्यापासून त्याचा डास होण्यास आठ ते दहा दिवसांचा कालावधी लागतो.

Umte Dam : उमटे धरणासाठी तरुणांचा संघर्ष; प्रशासन, लोकप्रतिनिधींना अखेर जाग

स्वच्छता गरजेची

साठलेले पाणी दर आठवड्यात एकदा पूर्णपणे वापरावे, ड्रम कोरड करावा आणि त्यानंतर परत पाणी भरल्यास त्या पाण्यात असलेल्या अंडी, अळ्या मारतील व डासांच्या उत्पत्तीस आळा बसेल, असे आरोग्या विभागाने नमूद केले आहे. घरातील पाण्याचे काही साठे असे पूर्णपणे रिकामे करता येणे शक्य नसते. घरावर असलेली पाण्याची टाकी किंवा तळघरात असलेली पाण्याची टाकी अशा ठिकाणी डासांनी अंडी घालू नयेत, म्हणून टाक्या पूर्णपणे झाकण टाकून बंद ठेवाव्यात.फ्लॉवर पॉट, कुलर, फ्रिजचा खालचा ट्रे अशा ठिकाणी पाणी साठलेले असते. दर आठवड्याला या वस्तूंतील पाणी न बदलल्यास डासांना अंडी घालण्यास जागा मिळते.

समितीची स्थापना

कीटकजन्य आजार नियंत्रणासाठी पालिकेने आरोग्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली ‘मॉस्क्युटो अबेटमेंट समिती’ स्थापना केली आहे. शहरातील बांधकाम व्यावसायिक, गृहनिर्माण सोसायटी अध्यक्ष व औद्योगिक आस्थापना यांना उपाययोजनांविषयी माहितीपत्र देण्यात आले आहे. सर्व डॉक्टर; तसेच सर्व पालिका रुग्णालयांत आढळलेल्या रुग्णाचा रक्तजल नमुना निश्चित निदानासाठी वाय. सी. एम. रुग्णालय येथे पाठवण्याबाबत सूचना देण्यात आल्या आहेत.

दर आठवड्याला जनजागृती

‘वैद्यकीय विभागांतर्गत आठ रुग्णालये आणि ३४ दवाखान्यांमार्फत प्रत्येक आठवड्याला लहान बालकांच्या लसीकरण सत्रामध्ये प्रादुर्भाव रोखण्यासाठी जनजागृती केली जात आहे. एमपीडब्ल्यू व एएनएम कर्मचाऱ्यांमार्फत परिसराची स्वच्छता, घरांमधील साफसफाई, रोगाचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी आवश्यक काळजी या बाबींसंदर्भात नागरिकांना शिक्षण देण्यात येत आहे,’ असे वैद्यकीय विभागाने म्हटले आहे.

‘रॅपिड किट’ उपलब्ध

‘पालिकेच्या रुग्णालयांत व दवाखान्यांमध्ये डेंग्यू तपासणीसाठी आवश्यक ‘रॅपिड किट’ उपलब्ध करून देण्यात आले आहे. डासोत्पत्तींची स्थाने नष्ट करण्यासह अळी प्रतिबंधक उपाययोजनांतर्गत स्वच्छ पाण्यात गप्पी मासे सोडणे, घरोघरी कंटेनर सर्वेक्षण, व्यवसायाच्या ठिकाणांचे सर्वेक्षण करण्साठी आरोग्य मुख्य कार्यालयास पत्रव्यवहार करण्यात आला आहे. भंगार मालाची व टायर, पंक्चर दुकाने तपासणी मोहीम वैद्यकीय आणि आरोग्य विभागांनी संयुक्तिक पद्धतीने राबवली आहे,’ असे स्पष्ट करण्यात आले.

नागरिकांनी काय करावे?

– पाणी साठवण्याची भांडी कोरडी करणे.

– मोठ्या टाक्यांना घट्ट झाकण बसवणे.

– कुलर, फ्रिजखालील ट्रेमधील पाणी संपवणे.

– भंगार मालाची त्वरित विल्हेवाट लावणे.

– घराभोवतीची पाण्याची डबकी बुजवणे.