Pune News : गुंतवणूक करताना जोखीम पत्करण्याची मानसिकता हवी, शेअर मार्केटबाबत राष्ट्रीय परिषदेत मार्गदर्शन

प्रतिनिधी, पुणे : ‘शेअर बाजारात चढ-उतार होत राहतो. बाजार अचानक उसळी घेतो, तर अचानक कोसळतो. हा व्यवसाय अनिश्चित स्वरूपाचा आहे. त्यामुळे शेअर बाजारात व्यवसाय किंवा गुंतवणूक करताना संयम, सामंजस्य व जोखीम पत्करण्याची मानसिकता हवी,’ असे मत ‘दी इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडिया’चे (आयसीएआय) केंद्रीय उपाध्यक्ष सीए चरणज्योत सिंग नंदा यांनी व्यक्त केले.‘आयसीएआय पुणे शाखे’तर्फे आयोजित शेअर मार्केटवरील दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे उद्घाटन सीए नंदा यांच्या हस्ते झाले. त्या वेळी ते बोलत होते. ‘सीएफएमआयपी’चे अध्यक्ष सीए दुर्गेश काबरा, केंद्रीय समिती सदस्य सीए चंद्रशेखर चितळे, सीए राजकुमार अडुकिया, विभागीय समिती सदस्य सीए यशवंत कासार व सीए ऋता चितळे, पुणे शाखेच्या अध्यक्षा सीए अमृता कुलकर्णी आदी या वेळी उपस्थित होते. परिषदेला ४००पेक्षा अधिक सनदी लेखापाल, गुंतवणूकदार, व्यावसायिक, आर्थिक सल्लागारांनी सहभाग नोंदवला.

Pune Crime : सायबर चोरट्यांच्या टार्गेटवर महिलावर्ग, अशा प्रकारे फसवणूक केल्याचे प्रकार उघडकीस
‘शेअर बाजारात येताना केवळ पैसे कमवण्याचा दृष्टिकोन असू नये. भावनांवर संयम असावा. नुकसान झाले, तर खचू नये आणि लाभ झाला, तर हुरळून जाऊ नये. शेअर बाजाराची रचना समजून घेऊन वास्तवात जगावे. शिस्त पाळण्यासह शेअर बाजारातील आपला उद्देश नेमका काय, हे निश्चित करावे. असे केल्यास गुंतवणूकदारांना नक्की चांगला परतावा मिळू शकतो,’ असे सिंग यांनी सांगितले.

सीए दुर्गेश काबरा म्हणाले, ‘देशभरात एक लाख ६० हजार व्यवसाय करणारे सीए आहेत. शेअर बाजारात सीएंसाठी विविध संधी आहेत. शेअर मार्केटचा अभ्यास करावा.’ सीए प्रणव मंत्री यांनी सूत्रसंचालन केले. सीए सचिन मिनीयार यांनी आभार मानले.