तरुणीला प्रेमाच्या जाळ्यात ओढून तिच्यावर लैंगिक अत्याचार आणि नंतर तिला धमकावून गर्भपात केल्याप्रकरणी एका तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संबंधित तरुण माजी नगरसेविकेचा मुलगा आहे. याबाबत पीडित तरुणीने भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्याची आई माजी नगरसेविका असल्याची माहिती पोलिसांनी दिली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी तरुण आणि पीडित तरुणीची 2021 मध्ये एका व्यायामशाळेत ओळख झाली होती. पीडित तरुणीचा व्यवसाय आहे. ओळखीचे रूपांतर पुढे मैत्रीत झाले.
त्यानंतर आरोपीने तरुणीला प्रेमाच्या जाळ्यात ओढले. तो तिला भेटण्यासाठी घरी जायचा. तिने त्याच्याकडे विवाहाबाबत विचारणा केली, तेव्हा त्याने टाळाटाळ सुरू केली. आरोपीचे अन्य तरुणींशी प्रेमसंबंध असल्याचा संशय तरुणीला होता. याबाबत तिने विचारणा केली असता त्याने तिला शिवीगाळ करून धमकावले. तिला मारहाण केली. मारहाण केल्यानंतर तरुणीने त्याच्याशी बोलणे बंद केले, असे पीडित तरुणीने दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे.
कोथरूडमध्ये सदनिकेत ज्येष्ठ महिलेचा होरपळून मृत्यू
कोथरूड भागातील एका सोसायटीतील सदनिकेत ज्येष्ठ महिला जळालेल्या अवस्थेत सापडली. 76 वर्षीय महिलेने पेटवून घेऊन जीवन संपवल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. याप्रकरणी कोथरूड पोलिसांकडून तपास करण्यात येत आहे. कमल संपतराव घुगे असे मृतावस्थेत सापडलेल्या महिलेचे नाव आहे. कोथरूड भागातील गुरू गणेशनगर परिसरातील एका सोसायटीत कमल घुगे राहायला आहेत. सोमवारी सकाळी साडेआठच्या सुमारास सोसायटीतील रहिवाशांनी अग्निशामक दलाला संपर्क साधला.
तेव्हा घुगे गंभीर होरपळल्या होत्या
घुगे यांच्या सदनिकेतून धूर येत असल्याची माहिती रहिवाशांनी दिली. या घटनेची माहिती मिळताच दलाचे केंद्रप्रमुख प्रकाश गोरे आणि जवानांनी घटनास्थळी धाव घेतली. पहिल्या मजल्यावरील सदनिकेचा दरवाजा जवानांनी उघडला. तेव्हा घुगे गंभीर होरपळल्या होत्या. सदनिकेतील साहित्याला आग लागली नव्हती. घुगे यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारांपूर्वीच त्यांचा मृत्यू झाला होता.
धनकवडीतील दुर्घटनेप्रकरणी उपाहारगृह मालक अटकेत
धनकवडीतील एका उपाहारगृहात रविवारी दुपारी सिलिंडरमधून गॅसगळती होऊन लागलेल्या आगीत कामगाराचा मृत्यू झाल्याप्रकरणी उपाहारगृह मालकाला अटक करण्यात आली. कामगाराचा मृत्यू, तसेच निष्काळजीपणा दाखविल्याप्रकरणी उपाहारगृह मालकाविरुद्ध सहकारनगर पोलिसांनी सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला.