पुण्यात हिरव्या रंगावर भगवा रंग
पुण्यात सदाशिव पेठेत सध्या कलर वॉर रंगलं आहे. पण हा केवळ रंगाचा विषय नाही तर त्यामाध्यमातून जागा काबीज करण्यात येत असल्याचा आरोप भाजपा खासदार मेधा कुलकर्णी यांनी केला आहे. सदाशिव पेठेत एका भिंतीच्या कोपर्यात हिरवा रंग देण्यात आला. तिथं चादर लावून फुलं चढवण्यात आल्याचा प्रकार समोर आला. हा प्रकार समोर आल्यानंतर भाजपा खासदार मेधा कुलकर्णी यांनी या ठिकाणी तातडीनं भेट दिली. त्यांनी आणि कार्यकर्त्यांनी हिरव्या रंगावर भगवा रंग दिला. त्याठिकाणी गणपतीचा फोटो ठेवला. त्यावरून आता चर्चेला पेव फुटले आहेत.
मेधा कुलकर्णी समाज माध्यमांवर झाल्या व्यक्त
या घटनेनंतर मेधा कुलकर्णी यांनी समाज माध्यमावर याविषयीची पोस्ट केली. काल सदाशिव पेठेतील ज्ञानप्रबोधिनी शाळेच्या शेजारील गल्लीत हिरवा रंग देऊन, त्याठिकाणी हार, फुले, अगरबत्ती लावण्यात आल्याचे समोर आले. त्याचे फोटो आणि व्हिडिओ व्हाट्सअपवर व्हायरल झाले. त्यामुळे या ठिकाणी आवर्जून दाखल झाले. मला व्हाट्सअप वर माहिती समजली ती मी व्हेरिफाय केली. तिथं कधीही यापूर्वी हिरवा रंग किंवा प्रार्थनास्थळामध्ये रूपांतर करण्याचा प्रयत्न झाला नव्हता. ती भिंत एका संस्थेच्या इमारतीचा पार्ट आहे. मला अनेकांनी व्हाट्सअप वर तो मेसेज पाठवला होता. आम्ही तिथे ॲक्शन घेतली हिरव्याच भगव करून टाकलं.शनिवार वाड्याच्या आसपास देखील अशा काही घटना आहेत. तेव्हा देखील पोलिसांना कळवलं होतं, अशी पोस्ट त्यांनी शेअर केली.
जागा काबीज करण्याची खेळी
असा अचानक हिरवा रंग का दिला जातोय, असा प्रश्न करत, त्यामागील खेळी काय आहे, हे त्यांनी समोर आणलं. असे प्रकार कुठं झाले तर हे तुम्ही त्यांना विचारण्याची आवश्यकता आहे. महाराष्ट्रासह देशाच्या अनेक भागात अशा गोष्टी चालू आहेत. हळूहळू जागा काबीज केल्या जातात. छोट्या पद्धतीने सुरू झालेली कृती मोठ्या प्रार्थना स्थळांमध्ये रूपांतरित होतात, असा आरोप त्यांनी केला. महाराष्ट्रात आणि देशात लोक अस्वस्थ आहेत अचानकपणे वक्फ बोर्ड जमिनीवर दावा करतो, याकडे त्यांनी लक्ष वेधले.
हिंदूंनी जागरुक राहावं
अशा घटना आम्ही सहन करणार नाही, असा इशारा खासदार मेधा कुलकर्णी यांनी दिला. हिरवा रंग देणारा व्यक्ती हिंदू आहे, असे समोर येत आहे. हे हिंदूंचा वापर करण्याचे एक नवीन तंत्र असू शकतं. हिंदूंनी अलर्ट होऊन अशा गोष्टींचा साधन नाही झालं पाहिजे. हिंदू भरकटला असेल तर आम्ही त्यांना जागं करू, असे त्या म्हणाल्या.
सुषमा अंधारे यांची टीका
शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी या सर्व घटनेवर प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी खासदारांवर तोंडसुख घेतले आहे. ‘हेच करायचे असेल तर साध्वी होऊन धर्मप्रचार प्रसाराच्या कार्यात योगदान द्या. खासदार व्यक्तीने हा बालिशपणा करण्यापेक्षा हीच तत्परता पुणे जिल्ह्यातील अल्पवयीन मुलींवरील लैंगिक अत्याचार घटनास्थळी जाऊन पिडीतेला न्याय देण्यात दाखवली तर लोकप्रतिनिधी असण्याचे चीज होईल.’ असा टोला त्यांनी लगावला.