केंद्र सरकारतर्फे स्वच्छ भारत मिशन अंतर्गत स्वच्छ भारत सर्वेक्षण स्पर्धेत चांगली कामगिरी करण्यासाठी पालिकेने कार्यवाही सुरू केली आहे. यानिमित्त अतिरिक्त आयुक्तांनी गुरुवारी आढावा बैठक घेतली. या बैठकीला घनकचरा व्यवस्थापन उपायुक्त संदीप कदम, सर्व परिमंडळ उपायुक्त, सर्व क्षेत्रीय कार्यालयांचे सहायक आयुक्त, घनकचरा व्यवस्थापन विभागाचे अधिकारी, मोटार वाहन विभागाचे अधिकारी, कर्मचारी, आरोग्य निरीक्षक आदी उपस्थित होते.
या बैठकीत सर्व क्षेत्रीय कार्यालयांमार्फत घनकचरा व्यवस्थापन व स्वच्छतेविषयक कामकाजाचे सादरीकरण करण्यात आले. दंडात्मक कारवाईचा अहवालही या वेळी मांडण्यात आला. त्याचबरोबर आवश्यक साधनसामुग्रीविषयीची मागणीही करण्यात आली. त्याचा आढावा घेऊन पृथ्वीराज यांनी आवश्यक सूचना दिल्या.
‘स्वच्छ सर्वेक्षणासाठी सज्ज राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. पाणी साठणारी ठिकाणे त्वरित साफ करण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्याचबरोबर झिका व डेंगीचा फैलाव रोखण्यासाठी डासांची उत्पत्तीस्थाने आढळणाऱ्या ठिकाणी दंडात्मक कारवाई करण्याच्याही सूचना दिल्या आहेत. पुढील बैठकीत याचा आढावा घेतला जाईल,’ असे पृथ्वीराज बी.पी. यांनी स्पष्ट केले.
कर्मचाऱ्यांनीही मांडल्या समस्या
आरोग्य निरीक्षक व क्षेत्रीय कार्यालयाच्या कर्मचाऱ्यांनी या वेळी आपल्याला भेडसावत असलेल्या समस्या तसेच आवश्यक साधनसामुग्रीची माहिती दिली. यात कचरा संकलनासाठीच्या गाड्यांची संख्या वाढविणे, कर्मचाऱ्यांची संख्या वाढविणे, स्वच्छतागृहांच्या स्वच्छतेसाठीच्या ठेकेदारांशी समन्वय आदीबाबतच्या समस्या मांडल्या. त्यावर अधिक माहिती घेऊन आवश्यक उपाययोजना केल्या जातील, असे अतिरिक्त आयुक्तांनी स्पष्ट केले.
स्वच्छ भारत सर्वेक्षणात पुणे शहराची कामगिरी अधिक उंचावण्याचे पालिकेचे उद्दिष्ट आहे. त्यासाठी आतापासूनच तयारी सुरू करण्यात आली आहे. सर्व क्षेत्रीय कार्यालयानिहाय सद्यस्थितीचा आढावा घेऊन सूचना दिल्या आहेत. सातत्याने आढावा बैठका घेऊन त्याची नोंद ठेवली जाणार आहे.– पृथ्वीराज बी. पी, अतिरिक्त आयुक्त, महापालिका