गेल्या वर्षी ८० लाखांहून अधिक प्रवाशांचा प्रवास
पुण्याचे खासदार आणि नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी संरक्षणमंत्री राजनाथसिंह यांची भेट घेऊन पुणे विमानतळाच्या धावपट्टी वाढविण्याबाबत चर्चा केली होती. तसेच, त्यासाठीचे पत्र दिले होते. तसेच, नागरी वाहतूक मंत्रालयाच्या मुख्य सचिवांची भेट घेऊन धावपट्टी वाढविण्यासाठी लागणाऱ्या गोष्टींचा पाठपुरावा केला होता. त्यानुसार पुण्याचे विभागीय आयुक्त यांच्या उपस्थितीत संरक्षण सचिवांच्या अध्यक्षतेखाली सोमवारी झालेल्या बैठकीत संरक्षण मंत्रालयाने ‘एएआय’ला ‘ओएलएस’ सर्वेक्षण करण्यास परवानगी दिली आहे. पुणे विमानतळाची सध्याची धावपट्टी भारतीय हवाई दलाच्या मालकीची असल्याने हा विषय संरक्षण मंत्रालयाच्या अखत्यारित येतो. भारत सध्या जगातील तिसऱ्या क्रमांकाची देशांतर्गत नागरी विमान वाहतूक बाजारपेठ आहे. त्यातही पुणे विमानतळ हे प्रवाशांची वर्दळ असलेल्या व्यग्र विमानतळांच्या यादीत नवव्या क्रमांकावर आहे. पुणे विमानतळावरून गेल्या वर्षी ८० लाखांहून अधिक प्रवाशांनी प्रवास केला. भविष्यात ही वाढ कायम राखण्यासाठी आवश्यक पायाभूत सुविधांसह विमानतळाचा रन वे (धावपट्टी) वाढविण्याची आवश्यकता आहे. सध्याच्या धावपट्टीचा विस्तार करून हा प्रश्न सोडवला जाऊ शकतो, असे मोहोळ यांनी निदर्शनास आणून दिले.
ओएलएस सर्वेक्षण म्हणजे काय
पुणे विमानतळाची धावपट्टी साधारण एक किलोमीटरने वाढवली जाणार आहे. त्यासाठी ३५ एकर जागा संपादित करावी लागणार आहे. जागा संपादित केली जाणाऱ्या परिसरात हे ओएलएस सर्वेक्षण केले जाणार आहे. यामध्ये धावपट्टी वाढवली जाणाऱ्या ठिकाणी उंच इमारत, टॉवर, उंच झाडे येत नाहीत ना, याची ‘इलेक्ट्रॉनिक उपकरणा’च्या माध्यमातून आढावा घेतला जातो. त्याचा एकत्रित अहवाल पुढील मान्यतेसाठी सादर केला जातो.
सध्याच्या धावपट्टीचा विस्तार करण्याची गरज होती
युरोपीय देश, अमेरिका, जपान या देशांशी थेट आंतरराष्ट्रीय कनेक्टिव्हिटी उपलब्ध नसल्यामुळे शहराच्या वाढीवर त्याचा गंभीर परिणाम होत आहे. मोठ्या आंतराराष्ट्रीय विमानांवर छोट्या धावपट्टीमुळे इथून उड्डाण घेण्यास मर्यादा येत आहेत. या महाकाय विमानांची (कोड डी/ई प्रकारची विमाने) हालचाल सुलभ करण्यासाठी सध्याच्या धावपट्टीचा विस्तार करण्याची गरज होती. संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी मंजुरी दिल्याने पुणे विमानतळाच्या धावपट्टीचा विस्तार होईल व मोठ्या आकाराची विमानेही इथून उड्डाण घेऊ शकतील.
– मुरलीधर मोहोळ, नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री