खून केल्यानंतर पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न
प्रतीक्षा जयदीप यादव (वय २१) असे खून झालेल्या विवाहितेचे नाव असून या प्रकरणी आरोपी पती जयदीप अर्जुन यादव (वय ३०) याला देहूरोड पोलिसांनी अटक केली आहे. खून केल्यानंतर जयदीप याने पुरावा नष्ट करण्यासाठी दोघांचे मोबाईल इंद्रायणी नदीत फेकून दिल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणी आरोपीला २७ जूनपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे. पोलीस अंमलदार किरण राजाभाऊ पाटील यांनी देहूरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
स्वतःचा मोबाईल इंद्रायणी नदीत फेकला
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सांगली जिल्ह्यातील जयदीप यादव याने डिप्लोमा इंजिनिअरिंग केले होते, अशी माहिती समोर येत आहे. त्याचा प्रतीक्षा हिच्यासोबत दोन महिन्यांपूर्वी विवाह झाला होता. वडिलांनी मुलीला एमएससी पर्यंत शिक्षण देऊन उच्चशिक्षित केले होते. जयदीप हा पुण्यात कामाला होता. आठ दिवसांपूर्वीच जयदीप याने पत्नी प्रतीक्षा हिला पुण्यात आणले होते. मात्र शारिरिक संबंध ठेवण्यास तिने नकार दिला. त्यामुळे त्याच्या मनात तिच्याविषयी संशय निर्माण झाला. तो राग मनात ठेवून गुरवारी जयदीप याने पत्नीला देहू गावातील गाथा मंदिराच्या मागे फिरण्यासाठी नेले. तेथे त्याने ओढणीच्या सहायने प्रतीक्षा तिचा गळा आवळून खून केला. खून केल्यानंतर त्याने पुरावे नष्ट करण्यासाठी पत्नीचा आणि स्वतःचा मोबाईल इंद्रायणी नदीत फेकून दिला.
याबाबत पोलिसांना माहिती मिळाल्यानंतर त्यांनी संशयित म्हणून पतीला ताब्यात घेतले. त्याने गुन्ह्यांची कबुली दिली असून त्याला अटक करण्यात आली आहे. त्याला २७ जुनपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.