म. टा. वृत्तसेवा, राजगुरुनगर : खेड तालुक्यात गेल्या आर्थिक वर्षात वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात १३५ जनावरांचा मृत्यू झाल्याप्रकरणी वन विभागाच्या वतीने १०८ शेतकऱ्यांना ११ लाख ५० हजार ९४१ रुपयांची नुकसानभरपाई देण्यात आल्याची माहिती राजगुरुनगर वन विभागाचे वनक्षेत्रपाल प्रदीप रौंधळ यांनी दिली.वन्यप्राण्यांच्या हल्यात ७१ शेळ्या, २० बोकड, २६ कालवडी, दोन पारडे, सहा मेंढ्या, दोन घोडे आणि आठ गोऱ्ह्यांचा बळी गेला आहे. यामध्ये बिबट्याच्या हल्ल्यात बळी गेलेल्या जनावरांचाही समावेश आहे. याबाबत वन विभागाकडे दाखल करण्यात आलेल्या प्रस्तावानुसार नुकसान भरपाई देण्यात आली आहे.
तसेच, चास ते बुरसेवाडी पट्यात वन्य प्राण्यांकडून भुईमूग, सोयाबीन आणि मका पिकांचेही नुकसान झाल्याबाबत ६२ तक्रारी आल्या होत्या. याची खातरजमा केल्यानंतर वन विभागाने प्रस्ताव तयार केला आणि घटनास्थळी जाऊन पंचनामा केल्यानंतर नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दोन लाख ५५ हजार ८२ रुपयांची भरपाई देण्यात आल्याची माहिती रौंधळ यांनी दिली.