Pune News: भुशी डॅम दुर्घटनेनंतर ताम्हिणी घाटात तरुण वाहून गेला, अंगावर काटा आणणारा VIDEO

पुणे: लोणावळ्यातील भुशी डॅम परिसरामधील पर्यटक वाहून जाण्याची घटना ताजी असतानाच आता आणखीन एक व्हिडिओ समोर आला आहे. मुळशी तालुक्यातील ताम्हिणी घाट परिसरामध्ये वर्षाविहारासाठी आलेला एका ३२ वर्षीय तरुण धबधब्याच्या पाण्यामध्ये वाहून गेल्याचे समोर आले आहे. याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

स्वप्निल धावडे असे वाहून गेलेल्या तरुणाचे नाव आहे. तो भोसरी परिसरातील राहणारा असल्याची माहिती समोर आली आहे. जिम मधील ३२ जणांच्या ग्रुपसोबत ताम्हिणी घाट परिसरामध्ये फिरायला आला होता. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर हा प्रकार समोर आला आहे.

अंगावर शहारे आणणारा व्हिडिओ


मुळशी तालुक्यातील ताम्हिणी घाट परिसरामध्ये पावसाची संततधार सुरू आहे. धबधब्यांमध्ये पाण्याचा प्रवाह देखील वाढू लागला आहे. या घटनेची माहिती मिळताच पौड पोलीस तसेच शिवदुर्ग टीम, ताम्हिणी घाट वनविभाग यांनी या तरुणांचे शोध कार्य सुरू केले होते. मात्र, तो मिळाला नव्हता. आज सकाळी शोध कार्य सुरू केल्यानंतर त्याचा मृतदेह रायगड जिल्ह्यातील माणगाव येथे आढळून आला आहे.

लोणावळ्यातील या घटनेनंतर ताम्हिणी घाट परिसरामध्ये देखील अशीच घटना घडल्याने सर्वांनाच धक्का बसला आहे. पर्यटकांचा अति उत्साहीपणा देखील अशा घटनांसाठी जबाबदार असल्याचे पहायला मिळत आहे. व्हिडिओमध्ये दिसत असल्याप्रमाणे पाऊस सुरू असताना हा तरुण त्या धबधब्यात उडी मारताना पाहायला मिळत आहे. उडी मारल्यानंतर पाण्याच्या प्रवाहाबरोबर तो वाहून गेल्याचे देखील दिसत आहे.

अंगावर शहारा आणणारा हा व्हिडिओ सोशल मीडियावर फिरतो आहे. अशा घटना रोखण्यासाठी वनविभागाने आणि प्रशासनाने कठोर पावले उचलणे गरजेचे आहे. अन्यथा अशा पर्यटकांमुळे अनेकांना आपला जीव लागू शकतो.