Pune News : पुण्यात ‘साहिवाल’चे डेटा सेंटर; संशोधन करून क्षमतावाढ, जाणून घ्या साहिवाल गायींची वैशिष्ट्ये

प्रतिनिधी, पुणे : उत्तम दर्जाच्या दुधासाठी देशात प्रसिद्ध असलेल्या साहिवाल जातीच्या गायींवर संशोधन करून त्यांची क्षमता वाढवण्यासाठी या गायींची माहिती संकलित करण्याचे केंद्र (डेटा सेंटर) पुण्यात सुरू केले जाणार आहे. पुण्यातील कृषी महाविद्यालयामध्ये हे केंद्र सुरू करणार असल्याची माहिती भारतीय कृषी संशोधन संस्थेकडून प्राप्त झाली आहे.‘भारतीय कृषी संशोधन संस्थेअंतर्गत उत्तर प्रदेशातील मेरठ येथे केंद्रीय गाय संशोधन संस्था कार्यरत आहे. या संस्थेकडून पुण्यातील कृषी महाविद्यालयामध्ये साहिवाल गायींची माहिती संकलित करण्यासाठी डेटा सेंटर सुरू करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. यासाठीचा निधीही संस्थेकडून उपलब्ध केला जाणार आहे,’ अशी माहिती महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कुलगुरू कर्नल डॉ. प्रशांतकुमार पाटील (निवृत्त) यांनी दिली.

Pune News : पर्यावरण संवर्धनात ‘सीएसआर’ संकल्पनेची मोलाची भूमिका, तज्ज्ञ डॉ. अनिल धनेश्वर यांची माहिती

प्रकल्पाचे उद्दिष्ट काय?

– दुधासाठी प्रसिद्ध असलेल्या साहिवाल गायींच्या अनुवंशिक क्षमतेचे संवर्धन, प्रसार व अनुवंशिक सुधारणा करणे.

– त्यामुळे महाराष्ट्रामध्ये देशी गायींच्या दूध उत्पादनवाढीस हातभार लागेल.

साहिवाल गायींची वैशिष्ट्ये काय?

– भारत, पाकिस्तानच्या सीमावर्ती पंजाबमधील साहिवाल जिल्हा हे या गायींचे उगमस्थान आहे.

– या गाई लांबी बार, लोला, मॉन्टगोमेरी, मुलतानी आणि तेली या नावांनीही ओळखल्या जातात.

– छोटे डोके आणि शिंगे हे या गायीचे प्रमुख वैशिष्ट्य आहे. या गायींचे पाय छोटे असतात आणि शेपटी लहान असते.

– अत्यंत शांत स्वभावाच्या सहिवाल गायी सर्वोत्कृष्ट दूध देणाऱ्या देशी गायींमध्ये गणल्या जातात.

– उष्णता सहन करीत जास्त दूध देण्याच्या त्यांच्या क्षमतेमुळे त्या आशिया खंडातीलच नव्हे; तर जगातील २७ देशांमध्ये निर्यात केल्या जातात.

– साहिवाल गायींची सरासरी दूध उत्पादन क्षमता प्रति वेत २५०० ते २७५० लिटर आहे.

– दुधातील स्निग्धांशाचे प्रमाण ४.५ ते ४.७५ टक्के आहे.

– या गायीचे बैल मध्यम आकाराचे असतात. बैलांचा रंग गायींप्रमाणेच असतो, मात्र वशिंडाजवळ काळसर गडद छटा असते.

– वशिंड मध्यम आकाराचे घट्ट असते. शरीराची त्वचा लोंबती असल्याने उष्णता सहन करण्याची क्षमता साहिवालमध्ये अधिक असते.

महाराष्ट्रातील ज्या शेतकऱ्यांकडे साहिवाल गायी आहेत त्यांना गायींची अनुवंशिक सुधारणा करण्यासाठी या प्रकल्पाची खूप मदत होणार आहे. शेतकऱ्यांच्या सहभागातून संशोधनाची संकल्पना या उपक्रमामुळे प्रत्यक्षात येणार आहे. दुधासाठी प्रसिद्ध असलेल्या साहिवाल गायीचे मोठे हब महाराष्ट्रात भविष्यात तयार होण्यास हे डेटा सेंटर मदत करील.

– डॉ. सोमनाथ माने, प्रमुख शास्त्रज्ञ, देशी गाय संशोधन केंद्र

‘साहिवाल क्लब’ची स्थापना

महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी अंतर्गत पुणे कृषी महाविद्यालयाच्या पशुसंवर्धन व दुग्धशास्त्र विभागाने सन २०१५ मध्ये साहिवाल क्लब ऑफ महाराष्ट्रा ची स्थापना पुणे जिल्ह्यामध्ये केली होती. त्यावेळी निवडक उच्चशिक्षित शेतकऱ्यांना व कृषी पदवीधरांना एकत्र करून अठरा गायींपासून हा प्रकल्प चालू केला होता. सध्या याच क्लबमध्ये सुमारे ५००० पेक्षा जास्त साहिवाल गायींचे संवर्धन करण्यात येत आहे. शेतकरी सहभागातून देशी पशुधनाच्या संवर्धनासाठी उभी राहिलेली ही देशातील एकमेव चळवळ आहे.