पुण्यातून मुरलीधर मोहोळ, रवींद्र धंगेकर, शिरूरमधून अमोल कोल्हे, शिवाजीराव आढळराव आणि मावळमधून संजोग वाघेरे आणि श्रीरंग बारणे यापैकी लोकसभेवर कोण जाणार याची उत्सुकता आता चार जूनपर्यत कायम राहणार आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी, काँग्रेसचे राहुल गांधी, शिवसेनेचे उद्धव ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेश शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार, प्रफुल्ल पटेल यांच्यासह अनेक नेत्यांच्या पुणे, मावळ, शिरूर मतदारसंघातील महायुती तसेच महाविकास आघाडीच्या सभा झाल्या. आरोप प्रत्यारोप, टिका टिपण्णी करीत प्रचार शिगेला पोहोचला होता. त्यामुळे ही निवडणूक चुरशीची ठरण्याची चिन्हे होती.
पुणे लोकसभा मतदारसंघातून महायुतीकडून मुरलीधर मोहोळ तर त्यांच्याविरोधात काँग्रेस महाविकास आघाडीकडून रवींद्र धंगेकर रिंगणात एकमेकांविरोधात उभे ठाकले होते. वसंत मोरे यांना वंचितने उमेदवारी दिली. गेल्या महिन्याभरापासून पदयात्रा, रॅली, सभा घेत प्रचार करण्यात आला. पुण्याचा विकास कसा होणार, पुण्याच्या विकासाचा अजेंडा काय असणार यावर दोन्ही उमेदवारांनी भर देत मतदारांना मतदानाचे आवाहन केले होते. शिरूरमध्ये महायुतीकडून शिवाजीराव आढळराव यांनी जनसंपर्क कायम करीत विकास कामे केल्याचा दावा केला होता. तर केंद्र सरकारचकडे मतदारसंघातील प्रश्न मांडत विकास कामे केल्याचा दावा डॉ. कोल्हे यांनी केला. मावळमधून श्रीरंग बारणे आणि संजोग वाघेरे यांनी विकास कामे करण्याचा विश्वास दाखविला.
गेल्या वेळी पुण्यात ४९.८७ टक्के मतदान झाले होते. त्या तुलनेत आता पुण्यात मताचा टक्का वाढणार असल्याचे स्पष्ट झाले. तर शिरूर आणि मावळमध्ये अनुक्रमे ५९.४४ आणि ५९.५७ टक्के इतके मतदान झाले होते. त्यावरून दोन्ही मतदारसंघात यंदा मतांचा टक्का कायम राहणार की घटणार हे आज, सायंकाळनंतर स्पष्ट होईल.