‘पुणे आयटी सिटी’तर्फे मेट्रोच्या मार्गिकेचे बांधकाम वेगाने सुरू आहे. या २३.३ किमीच्या मार्गासाठी ‘पुणे आयटी सिटी’मेट्रोकडून २२ ट्रेन संचाद्वारे प्रवाशांना सेवा दिली जाणार आहे. एका ट्रेनची प्रवासी क्षमता एक हजार असून, ताशी ८५ किमी वेगाने ती धावू शकणार आहे, असा दावा केला गेला आहे. पहिली ट्रेन दाखल झाल्यानंतर पुढील काही महिन्यांत टप्प्याटप्प्याने इतर ट्रेन माण येथील डेपोत येणार आहेत.
‘हिंजवडी ते शिवाजीनगर मार्गावरील सर्व ट्रेन्स अत्याधुनिक तंत्रज्ञानाने सुसज्ज असतील. या मार्गावरील सर्व ट्रेनसाठी ‘थर्ड रेल प्रणाली’चा वापर केला जाणार आहे. पहिली ट्रेन दाखल झाल्याने आमचा उत्साह वाढला असून, पुणेकरांना विश्वासार्ह सेवा देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत,’ असा विश्वास पुणे आयटी सिटी मेट्रोचे मुख्य कार्यकारी अधिकारी आलोक कपूर यांनी व्यक्त केला.
‘विविध सुविधा ट्रेनमध्ये’
पुणेकरांना मेट्रो प्रवासाचा सुखद अनुभव देण्याच्या दृष्टीने ‘पुणेरी मेट्रो’च्या ट्रेनची रचना करण्यात आली आहे. लक्षवेधक रंगसंगती, आकर्षक डिझाइन, प्रवाशांना अधिक आराम मिळावा, यासाठी ‘अर्गोनॉमिक आसनांची’ निवड आणि प्रवासाची नेमकी माहिती सातत्याने देणारी अत्याधुनिक प्रणाली, अशा सुविधा या ट्रेनद्वारे देण्याचा प्रयत्न आहे’, असा दावा ‘पुणे आयटी सिटी मेट्रो’च्या संचालक नेहा पंडित यांनी केला.