Pune News: पावसाळी वाहिन्यांत फुटबॉल, उशा अन् गाद्या; धनकवडी, सिंहगड रस्त्यावरील धक्कादायक प्रकार

प्रतिनिधी, पुणे : गाद्या, उशा, लाकडी तसबिरी, प्लास्टिकच्या वस्तू, थर्माकोल आणि फुटबॉल…. अशा आणि अनेक घरातील टाकाऊ वस्तू ‘सुज्ञ’ पुणेकरांनीच महापालिकेच्या सांडपाणी आणि पावसाळी पाण्याच्या वाहिन्यांमध्ये टाकण्याचे ‘कर्तव्य’ पार पाडले होते. त्यामुळेच पाणी वाहून जाण्यास अडथळा होऊन गेल्या आठवड्यात शहर तुंबले होते. पावसाळी वाहिन्यांची सफाई होऊनही त्यात एवढ्या मोठ्या प्रमाणावर कचरा आलाच कसा, हादेखील प्रश्नही उद्भवतोच!

गेल्या आठवड्यात पावसामुळे शहरातील रस्ते, घरे आणि दुकानांत पाणी गेल्याने पुणेकरांची चांगलीच तारांबळ उडाली. तत्पूर्वी पालिकेने ९० टक्के नालेसफाई पूर्ण झाल्याचा दावा केला होता. तरीही शहर तुंबल्याने सर्वांनी महापालिकेलाच लक्ष्य केले. उशिरा डोळे उघडलेल्या पालिकेने गेल्या आठवड्यात शनिवारी रात्री आणि रविवारी दिवसभर कर्मचाऱ्यांच्या मदतीने पाणी तुंबलेली ठिकाणे साफ केली. या साफसफाईदरम्यान सांडपाणी आणि पावसाळी वाहिन्यांच्या गटारांमध्ये वरील कचरा टाकल्याचे दिसून आले.

काढलेली माती परत चेंबरमध्ये

– रस्ते आणि चेंबर साफ केल्यानंतर त्यातील माती, गाळ काढून चेंबरच्या कडेला टाकला जातो. पावसामुळे तीच माती पुन्हा चेंबरमध्ये जाते. त्यामुळे नालेसफाई होत नसल्याचे स्पष्ट होऊन महापालिकेच्या स्वच्छतेच्या कारभारावरही प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.

– अनेक भागांतील पावसाळी वाहिन्यांमध्ये पाणीपुरवठ्याची वाहिनी आडवी येणे, गॅसच्या वाहिन्यांचा अडथळा असल्याचे समोर आले. याशिवाय ऑप्टिकल फायर केबल डक्टमधून नव्हे, तर पावसाळी वाहिन्यांमधून टाकल्याचे समोर आले आहे.

– त्यामुळे प्रशासनावर जोरदार टीका होत आहे. मात्र, या वाहिन्यांमध्ये गाद्या, उशा, फुटबॉल, प्लास्टिक असा कचराही आढळल्याने शहर तुंबण्यास नागरिकही जबाबदार असल्याचे समोर येत आहे.

सिंहगड रस्त्यावर गटारात गादी

सिंहगड रस्त्यावर ब्रह्मा हॉटेल परिसरात पावसाळ्यात मोठ्या प्रमाणावर पाणी तुंबले होते. पाणी कसे तुंबले, याचा शोध घेतल्यानंतर पावसाळी पाण्याच्या गटारामध्ये गादी, मोठा लोखंडी ड्रम आढळून आला. ही गादी आणि ड्रम काढल्यानंतर लगेचच पाणी ओसरले, अशी माहिती महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी दिली.
Mumbai Rain: पहिल्याच पावसात मुंबई तुंबली, ३० ठिकाणे पाण्यात, बीएमसीकडून अभ्यास सुरु
धनकवडीतील राऊत बाग नाला तुंबल्याने चेंबर खळखळून वाहत होते. यामुळे परिसरात दुर्गंधी पसरली होती. पालिकेचे कर्मचारी बोलावून सफाई करवून घेतली. त्या वेळी नाल्यात गादी, प्लास्टिक, थर्माकोल, फुटबॉल, फर्निचर आणि लोखंडी वस्तू सापडल्या. त्यामुळे नागरिकांनीही कचरा योग्य ठिकाणी टाकणे गरजेचे आहे.- विशाल तांबे, माजी अध्यक्ष, स्थायी समिती

नालेसफाईची बहुतांश कामे पूर्ण झाली आहेत. पहिल्या काही पावसात शहरात अन्य ठिकाणी साचलेली घाण वाहून येते. नालेसफाई केल्यानंतर नागरिकांनी पुन्हा कचरा टाकला असण्याची शक्यता आहे. ठेकेदारांनी संपूर्ण पावसाळ्यात नालेसफाई करणे गरजेचे असून, तशा सूचना देण्यात आल्या आहेत.- डॉ. राजेंद्र भोसले, आयुक्त, पुणे महापालिका