प्रतिनिधी, पुणे : ‘भौतिक विकास साध्य करताना पर्यावरणाकडे होणारे दुर्लक्ष, विविध घटकांचे असंतुलन आणि त्यातून निर्माण होणाऱ्या समस्या हा केवळ पुणे शहराचा प्रश्न नसून, संपूर्ण जगाचा प्रश्न आहे. शहराच्या पर्यावरण संवर्धनासाठी विविध घटकांनी पुढाकार घेण्याची गरज आहे. यात ‘कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी’ (सीएसआर) ही संकल्पना मोलाची भूमिका बजावेल,’ असा विश्वास सीएसआर तज्ज्ञ डॉ. अनिल धनेश्वर यांनी व्यक्त केला.‘एन्व्हायर्न्मेंटल क्लब ऑफ इंडिया’तर्फे ‘पुण्याच्या पर्यावरण संवर्धनात सीएसआरचे योगदान’ या विषयावर आयोजित व्याख्यानात धनेश्वर बोलत होते. ‘इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनीअर्स’च्या कॉन्फरन्स हॉलमध्ये झालेल्या या कार्यक्रमाला ‘कंपनी सेक्रेटरी असोसिएशन ऑफ इंडिया’चे माजी अध्यक्ष मकरंद लेले, ‘एन्व्हायर्न्मेंटल क्लब ऑफ इंडिया’चे संस्थापक दत्तात्रय देवळे उपस्थित होते. लेले यांनीही ‘सीएसआर’बद्दल मार्गदर्शन केले.
धनेश्वर म्हणाले, ‘सीएसआर निसर्गचक्राप्रमाणे आहे. जे काही समाजाकडून किंवा पर्यावरणाकडून मिळाले, तेच पुन्हा त्यांना अर्पण करणे हे उदात्त तत्त्व त्यामध्ये दडले आहे. कोणत्याही प्रकारचा भेदभाव न करता निसर्ग किंवा पर्यावरणाकडून सगळ्यांना काही ना काही मिळत असते. पर्यावरणाचे संवर्धन करणे आणि संरक्षण करणे, ही आपल्या सगळ्यांची जबाबदारी आहे.
यासाठी कार्यरत सामाजिक संस्था सीएसआरद्वारे निधी उभा करू शकतात.’ देवळे यांनी मनोगत व्यक्त केले. आमोद घमंडे यांनी कार्यक्रमाची भूमिका विशद केली. अॅड. अनिरुद्ध कुलकर्णी यांनी सूत्रसंचालन आणि नितीन गोरे यांनी उपस्थितांचे आभार मानले.