जानेवारीत घोषणा
वैद्यकीय महाविद्यालयांशी संलग्न असलेल्या राज्यातील सरकारी रुग्णालयांमध्ये यकृत प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया सुरू करण्याची घोषणा वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी ससून रुग्णालयात जानेवारीमध्ये झालेल्या जाहीर कार्यक्रमात केली होती. मात्र, ससून रुग्णालयातील यकृत प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया बंद पडण्याच्या मार्गावर असल्याने मंत्रिमहोदयांनी याकडे लक्ष देण्याची गरज आहे.
२०१८मध्ये पहिली शस्त्रक्रिया
ससून रुग्णालयात २०१८मध्ये पहिली यकृत प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया करण्यात आली होती. त्यानंतर आतापर्यंत केवळ पाच शस्त्रक्रिया करण्यात आल्या आहे. पूर्वी यकृताचा आजार असलेल्या रुग्णांसाठी एक कक्ष तयार करण्यात आला होता. त्यामुळे यकृताची गरज असलेल्या रुग्णांची नोंद होत होती. करोनानंतर ही सर्व प्रक्रिया थंडावली आहे.
प्रशासनात वाद
यकृत प्रत्यारोपणाबरोबरच मूत्रपिंड (किडनी) प्रत्यारोपणाची प्रक्रियादेखील संथगतीने सुरू आहे. गेल्या वर्षी यकृत प्रत्यारोपणाच्या परवान्याचे नूतनीकरण बरेच महिने रखडले होते. ससून रुग्णालयात गेल्या दोन वर्षांपासून वारंवार गैरप्रकार घडत आहे. प्रशासनात मोठ्या प्रमाणावर अंतर्गत वाद असल्याचेही समोर आले आहे. प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया करण्यासाठी पूर्वी खासगी रुग्णालयांमधील डॉक्टरांना बोलाविण्यात येत होते. मात्र, आता खासगी डॉक्टर येण्याचे प्रमाणही कमी झाल्याची माहिती काही वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिली आहे.
कॅन्सर सर्जन नाही
ससून रुग्णालयात कर्करोगावर उपचार करण्यात येतात. यासाठी मेडिसीन विभागामध्ये कर्करोगज्ज्ञ आहे. मात्र, शस्त्रक्रियेसाठी सर्जन नसल्याची स्थिती आहे. सर्जनचे पद मंजूर नसल्याची माहिती प्रशासनाने दिली. शस्त्रक्रिया विभागातील सर्जन या प्रकारच्या शस्त्रक्रिया करतात. शस्त्रक्रिया विभागातील काही डॉक्टरांनी या प्रकारच्या शस्त्रक्रिया करण्याचे प्रशिक्षण घेतल्याचेही प्रशासनाने सांगितले.
शस्त्रक्रिया कमी होण्याचे कारण काय?
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार ससून रुग्णालयात गेल्या काही वर्षांमध्ये यकृत प्रत्यारोपणाच्या पाच, तर किडनीच्या ३० शस्त्रक्रिया झाल्या आहेत. अवयव प्रत्यारोपणासाठी मेंदू मृत (ब्रेन डेड) रुग्ण मिळणे आवश्यक आहे. या प्रकारचे रुग्ण मिळणे कठीण असल्याने शस्त्रक्रिया करण्याचे प्रमाण कमी असल्याचा दावा रुग्णालय प्रशासनाने केला आहे. अवयव प्रत्यारोपणाची प्रक्रिया सुरळीत करण्यासाठी अधिष्ठाता आणि वैद्यकीय अधीक्षक यांची भूमिका महत्त्वाची आहे; परंतु गेल्या दोन वर्षांपासून सहा वैद्यकीय अधीक्षक बदलण्यात आले आहे. गेल्या दोन वर्षांमध्ये अधिष्ठात्यांवर विविध प्रकरणांमध्ये आरोप झाले आहेत.
कर्करोग रुग्णालय कागदावर?
ससून रुग्णालयाच्या जवळ असलेल्या राज्य रस्ते विकास महामंडळाच्या जागी कर्करोग रुग्णालयात सुरू करावे यासाठी गेल्या काही वर्षांपासून प्रयत्न सुरू आहेत. करोनापूर्वी ही जागा वैद्यकीय शिक्षण विभागाला मिळावी यासाठी प्रयत्नदेखील करण्यात आले. रुग्णालयासाठी किती निधी लागेल, किती कर्मचारी आणि तज्ज्ञ लागतील याची माहिती संकलित करण्यात आली. यासाठी कंपन्यांच्या सामाजिक उत्तरदायित्वाच्या माध्यमातून (सीएसआर) निधी मिळावा यासाठीही प्रयत्न सुरू होते. मात्र, करोनानंतर याकडेही प्रशासनाचे दुर्लक्ष झाल्याचे दिसून आले.
थंडबसत्यात गेलेले विभाग
– गेल्या वर्षी तत्कालीन अधिष्ठाता डॉ. संजीव ठाकूर यांनी लठ्ठपणा कमी करण्यासाठी बॅरिॲट्रिक शस्त्रक्रिया सुरू केल्या होत्या. यासाठी स्वतंत्र वॉर्ड तयार करण्यात आला होता. गेल्या वर्षी जवळपास १५ शस्त्रक्रिया करण्यात आल्या होत्या. शस्त्रक्रिया करणारे बहुतांश रुग्ण दुसऱ्या जिल्ह्यांतील होते. आता या रुग्णांना खासगी रुग्णालयात उपचार घेण्याची वेळ येत असल्याचे सोलापूर येथील एका रुग्णाने सांगितले.
– गॅस्ट्रोएन्ट्रोलॉजिस्ट, हेमेटोलॉजी, न्यूरोलॉजी या प्रकारच्या सेवा देण्यासाठी पूर्ण वेळ डॉक्टर नसल्याची स्थिती आहे. त्यामुळे या सेवांसाठी रुग्णांना ससूनऐवजी इतर पर्याय शोधावे लागत असल्याचे चित्र दिसून येते. यासाठी स्वतंत्र कक्ष नसले तरी या शाखेशी संबंधित डॉक्टर या सेवा देत असल्याचे प्रशासनाने सांगितले.