प्रतिनिधी, पुणे : ‘पाचव्या शतकात होऊन गेलेल्या वराहमिहिर या गणितज्ञाने आपल्या ‘बृहद्संहिता’ या प्राचीन ग्रंथात पर्जन्यमानाचे अंदाज खगोलशास्त्राच्या आधाराने अचूकपणे लावता येतील इतकी इत्थंभूत माहिती लिहून ठेवली आहे. होळी आणि अक्षय्य तृतीयेच्या सणांचे महत्त्व लक्षात घेऊन खगोलशास्त्राच्या आधारानेदेखील नैऋत्य मौसमी पावसाचे अंदाज अचूकपणे लावता येऊ शकतात,’ असा विश्वास ‘हायटेक बायोसायन्सेस’चे अध्यक्ष आणि ‘पर्जन्यमानाच्या अंदाजाच्या प्राचीन पद्धती’ या विषयाचे अभ्यासक डॉ. राघवेंद्र गायकैवारी यांनी व्यक्त केले.भांडारकर प्राच्यविद्या संशोधन मंदिर संस्थेतर्फे डॉ. राघवेंद्र गायकैवारी यांचे ‘वेध पर्जन्यमानाचा आधार प्राचीन वाङ्मयाचा’ या विषयावर शुक्रवारी व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. त्या वेळी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्योतिर्विद्या परिसंस्थेचे उपाध्यक्ष डॉ. दीपक जोशी होते. डॉ. गायकैवारी म्हणाले, ‘वराहमिहिरांनी सांगितलेल्या सूत्रांनुसार, भारतातील विविध गावांमध्ये होळी व अक्षय्य तृतीयेला वाहणारे वारे, त्यांची दिशा व गती, त्या वेळची ग्रहांची स्थिती, नक्षत्रांचा अभ्यास करून पावसाचा अंदाज बांधता येतो.
तो जवळपास ९० टक्क्यांच्या आसपास अचूक ठरतो, असे गेल्या सात वर्षांच्या निरीक्षणातून सिद्ध झाले आहे. या वर्षी पुण्याच्या जवळपासच्या भागात आणि नंदुरबार जिल्ह्यात विविध ठिकाणी अशी निरीक्षणे घेतली आहेत. ‘बृहद्संहिता’ या प्राचीन ग्रंथामध्ये भूगोल, खगोलशास्त्र, पाणी शोधण्याच्या पद्धती, पर्जन्यमानशास्त्र, वनस्पतीशास्त्र, ज्योतिष, भूकंप अशा विविध विषयांचा अंतर्भाव आहे.’ संस्थेचे मानद सचिव प्रा. सुधीर वैशंपायन यांनी प्रास्ताविक केले. अमृता नातू यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.