शरद वसंतराव गायकवाड (वय ४२) असे मृत झालेल्या व्यक्तीचे नाव असून ते पत्रकार होते. अपघात झाल्यानंतर घटनास्थळी मोठी वाहतूक कोंडी देखील झाली होती. याबाबत पोलिसांना माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी तातडीने धाव घेत मृतदेह पुढील कारवाईसाठी पाठवला आहे.
ट्रकची जबर धडक, पती-पत्नी हवेत उडाले अन्…
याबाबत अधिक माहिती अशी की, शरद गायकवाड रविवारी रात्री दहाच्या सुमारास आपल्या पत्नीसोबत एका मंदिराकडून डिकॅथलोन मॉलकडे जात होते. त्यावेळी रस्ता ओलांडत असताना रस्त्यावरून येणाऱ्या एका भरधाव ट्रकने या पती-पत्नीला जोराची धडक दिली. ट्रक वेगात असल्याने पती-पत्नीला जोरदार धडक बसली आणि ते दोघेही कित्येक फूट हवेत उडाले आणि खाली जमिनीवर आपटले. याघटनेत शरद गायकवाड यांच्या डोक्याला गंभीर मार लागल्याने त्यांचा जागेवरच मृत्यू झाला. तर त्यांच्या पत्नी गंभीर जखमी झाली आहे.
हिंजवडी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत ट्रक चालकाला ताब्यात घेतले आहे. ट्रकचालक मद्यधुंद अवस्थेत होता का याची तपासणी करण्यासाठी त्याला पुढील कारवाईसाठी पाठवण्यात आले आहे. तसेच गायकवाड यांचा मृतदेह औंध जिल्हा रुग्णालयामध्ये शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे.
या घटनेने वाकड परिसरामध्ये एकच खळबळ माजली असून सगळीकडे शोकाकूल वातावरण पसरले आहे. पुण्यामध्ये दिवसेंदिवस अपघाताचे प्रमाण वाढत आहे. ट्रक चालकावर रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. या प्रकरणी अधिक तपास हिंजवडी पोलीस करत आहेत.