प्रतिनिधी, पुणे : पुणे जिल्ह्यातून पंढपूरकडे संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज यांच्या पालख्यांचे लवकरच प्रस्थान होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात वेळेत पाऊस सुरू झाल्याने वारकऱ्यांची संख्या वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे वारकऱ्यांना शुद्ध पाणी, शौचालये, रस्ता सुरक्षा, आरोग्य यांसारख्या विविध सोयी सुविधा द्या, असे आदेश जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांनी प्रशासनाला दिले आहेत. सुरक्षेची काळजी घेण्यासाठी विविध विभागांनी समन्वयांनी काम करावे, अशीही सूचना त्यांनी केली आहे.श्री संत तुकाराम महाराज आणि श्री संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखी सोहळ्याच्या जिल्हाधिकारी डॉ. दिवसे यांनी पूर्वतयारी आढावा घेतला. त्या वेळी ते बोलत होते. या वेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष पाटील, ग्रामीण पोलिस अधीक्षक पंकज देशमुख, निवासी उपजिल्हाधिकारी ज्योती कदम, सहायक जिल्हाधिकारी डॉ. पूजा मनोरमा, दिलीप खेडकर, सार्वजनिक बांधकाम विभागाचे मुख्य अभियंता अतुल चव्हाण, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत वाघमारे आदी उपस्थित होते.
२,७०० स्वच्छतागृहांची उभारणी
संत ज्ञानेश्वर महाराज पालखीसाठी दीड हजार, संत तुकाराम महाराज पालखीसाठी एक हजार आणि संत सोपान महाराज पालखीसाठी मुक्काम, विसाव्याच्या ठिकाणी २०० अशी २,७०० स्वच्छतागृहे उभारण्यात येणार आहेत. तिन्ही पालख्यांसाठी मिळून १२ तात्पुरती निवारा केंद्रे उभारण्यात येणार आहेत. स्तनदा माता आणि बालकांसाठी हिरकणी कक्ष उभारण्यात येणार आहेत. १४० रुग्णवाहिका आणि ५७ रुग्णवाहिका पथक, ११२ वैद्यकीय अधिकारी, ३३६ आरोग्य अधिकारी नियुक्त करण्यात येणार आहेत. पिण्याच्या पाण्यासाठी २०० टँकरची व्यवस्था करण्यात येणार आहे, अशी माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी पाटील यांनी दिली.