बारावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर, विद्यार्थ्यांना आता कॉलेजांमध्ये प्रवेश घेण्याची उत्सुकता निर्माण झाली आहे. त्यासाठी विद्यार्थी आणि पालकांकडून कॉलेजांमध्ये विविध प्रकारच्या अभ्यासक्रमांची माहिती घेण्यात येत आहे. पुणे आणि पिंपरी-चिंचवड परिसरातील नामांकीत कॉलेजांमध्ये प्रवेश घेण्यासाठी राज्यातील विद्यार्थ्यांसह परराज्यातील विद्यार्थ्यांची पसंती असते. अशा परिस्थितीत विद्यार्थी आणि पालकांना बीए, बीकॉम, बीएस्सी, बी-व्होक अशा पारंपरिक अभ्यासक्रमांच्या प्रवेश प्रक्रियेबाबत योग्य माहिती मिळण्यासाठी ही प्रवेश प्रक्रिया ऑनलाइन पद्धतीने राबविण्यात येत आहे. त्यामुळे घरबसल्या विद्यार्थ्यांना प्रवेशाचा ऑनलाइन अर्ज भरता येत आहे.
ही प्रवेश प्रक्रिया संपूर्ण ऑनलाइन असल्याने, विद्यार्थ्यांना शुल्कही ऑनलाइन पद्धतीने भरण्याची सुविधा उपलब्ध आहे. अशा वेळी विद्यार्थी आणि पालकांनी कॉलेजांच्या वेबसाइटशी संपर्क साधून, अभ्यासक्रम आणि प्रवेश प्रक्रियेची माहिती घ्यावी, असे आवाहन प्राचार्यांनी केले आहे.
ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेचे टप्पे
– इच्छित कॉलेजच्या वेबसाइटवर जाऊन, नोंदणी करून आयडी, पासवर्ड मिळवणे.
– आयडी आणि पासवर्डद्वारे प्रवेशाचा अर्ज भरणे
– कागदपत्रे, दाखले अपलोड करून, अर्जासाठीचे शुल्क भरणे.
– प्रवेशासाठी गुणवत्ता यादी प्रसिद्ध होणे.
– गुणवत्ता यादीत नाव आल्यानंतर, शैक्षणिक शुल्क भरणे.
– कॉलेजात प्रत्यक्ष जाऊन कागदपत्रे जमा करणे.
‘बीबीए’, ‘बीसीए’साठी सीईटी
पुणे, मुंबई, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, नागपूर, अमरावती, कोल्हापूर अशा महानगरांतील कॉलेजांमध्ये बीबीए, बीएसए, बीएमएस असे अभ्यासक्रम राबविण्यात येतात. यंदापासून हे अभ्यासक्रम अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेच्या अखत्यारित गेल्यामुळे या अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी ‘सीईटी सेल’कडून स्वतंत्र सीईटी परीक्षा घेण्यात येत आहे. या ‘सीईटी’बाबत विद्यार्थ्यांना माहिती व्हावे, यासाठी कॉलेजांकडून जनजागृती करण्यात येत असल्याचे चित्र आहे.
पुण्यातील कॉलेजांमध्ये प्रवेश घेण्यासाठी राज्यातील विविध शहरांसोबत परराज्यातील विद्यार्थी येतात. या पार्श्वभूमीवर विद्यार्थी आणि पालकांना प्रवेशासाठी सुविधा निर्माण व्हावी, यासाठी आमच्यासह अनेक कॉलेजांनी संपूर्णपणे ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया राबविण्याचा निर्णय घेतला आहे. विद्यार्थ्यांनी कॉलेजच्या वेबसाइटला भेट दिल्यावर, एका क्लिकवर सर्व माहिती उपलब्ध होते.
– डॉ. राजेंद्र झुंझारराव, प्राचार्य, मॉडर्न कॉलेज ऑफ आर्ट्स, सायन्स अँड कॉमर्स