शहराच्या हद्दीवरील भागातील रस्त्यांत पाणी साचून राहिल्याने या भागांत नागरिकांना वाहतूक कोंडीसह विविध समस्यांचा सामना करावा लागला. त्यानंतर महापालिकेने केलेल्या पाहणीत विविध शासकीय विभागांच्या ताब्यात असलेल्या या रस्त्यांवर ही स्थिती उद्भवल्याचे निदर्शनास आले. या रस्त्यांमध्ये पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (पीएमआरडीए) राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या रस्त्यांचा समावेश आहे. काही ठिकाणी ‘महावितरण’च्या कामामुळे पाण्याला अडथळे होत आहेत. त्यामुळे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त पृथ्वीराज बी. पी. यांनी या सर्व विभागांची संयुक्त बैठक घेऊन सूचना केल्या.
पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर शहरातील नालेसफाईची कामे सुरू आहेत. धोकादायक ठिकाणांवरील स्वच्छतेची कामे पूर्ण झाली असली, तरी अनेक भागांतील पावसाळी गटारांच्या चेंबरची स्वच्छता झालेली नाही. त्याचबरोबर शहरातून राष्ट्रीय महामार्गही जातात. काही रस्ते सार्वजनिक बांधकाम विभागाच्या ताब्यात आहेत. तेथे त्यांच्या ठेकेदाराचा दोष दायित्व कालावधी (डीएलपी) असला, तरी अशा ठिकाणी पावसाळी चेंबरची स्वच्छता गेल्या अनेक वर्षांत केलेली नाही. त्यामुळे हद्दीत प्रवेश करणाऱ्या रस्त्यांवर सुमारे २० ते २५ ठिकाणी पाणी साचल्याचे दिसून आले. त्यात कात्रज ते देहू रस्ता हा बाह्यवळण मार्ग, कात्रज-कोंढवा रस्ता, सोलापूर रस्ता, बाणेर रस्ता, गणेशखिंड रस्त्याचा समावेश आहे.
पावसाळी पाणी वाहून जाण्यासाठी महापालिकेने ज्या भागांत कल्व्हर्ट बांधल्या आहेत. त्यातून महावितरण कंपनीच्या भूमिगत विद्युत वाहिन्या व्यवस्थित न बसविल्याने त्या नाल्यांमध्ये लटकत आहेत. पावसाळ्यात नाल्यांची पाणी पातळी वाढल्यानंतर या विद्युत वाहिन्यांमध्ये कचरा अडकून प्रवाहाला अडथळा निर्माण होत आहे. त्यामुळे यावर लवकरात लवकर उपाययोजना कराव्यात, अशा सूचना देण्यात आल्या आहेत.
पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर पीएमआरडीए, महावितरण, पीडब्ल्यूडी, एनएचएआयच्या अधिकाऱ्यांसोबत संयुक्त बैठक घेण्यात आली. रस्त्यावर पाणी साचू नये, यासाठी त्यांनी आवश्यक कामे करावीत, अशा सूचना देण्यात आल्या आहेत.
– पृथ्वीराज बी. पी., अतिरिक्त आयुक्त