पावले पुन्हा सायकलस्वारीकडे
पुण्यातील बहुसंख्य नागरिक व्यायामाबाबत जागरूक झाले आहेत. उत्तम शरीसासाठी सायकल चालविणे फलदायी असल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे सायकल चालविणाऱ्यांची संख्या वाढत आहे. अनेक जण आता सायकल घेऊन ऑफिसलाही जात आहेत. बरीच हौशी मंडळी सायकलींवरून शहरानजीक फेरफटकाही मारतात. सायकल ट्रेकरचे अनेक ग्रुपही शहरात तयार झाले आहेत.
महापालिकेचे स्वप्न भंगले
महापालिकेने शंभर किलोमीटरचे ‘सायकल ट्रॅक’ उभारण्याचे धोरण आखले. त्यानुसार, काही मार्गांवर ‘ट्रॅक’ची उभारणी करण्यात आली. कालौघात ‘ट्रॅक’वर अतिक्रमणे झाली, तरी महापालिकेने लक्ष दिले नाही. सद्यस्थितीत अनेक ठिकाणचे ‘सायकल ट्रॅक’ गायबही झाले आहेत. महापालिकने कोट्यवधी रुपये खर्चून हे ‘ट्रॅक’ उभारले. मात्र, त्यांचा काहीही फायदा झाला नाही. याशिवाय ‘शेअर-ए-सायकल’ ही योजना राबविण्याचे उद्दिष्टही निर्धारित करण्यात आले होते. त्यानुसार, काही ठिकाणी सायकली ठेवण्यातही आल्या होत्या. त्यातील काही सायकली चोरीला गेल्या. नियोजन योग्य न झाल्यामुळे ही योजनादेखील गुंडाळली गेली. ‘सायकलींचे शहर’ ही ओळख पुन्हा मिळवून देण्याचे महापालिकेचे स्वप्न भंगले.
शहरात सन २००७मध्ये सायकल ट्रॅकची संकल्पना अस्तित्वात आली. त्यानुसार १२६ किलोमीटरचे ट्रॅक तयार करण्यात आले. मात्र, देखभालदुरुस्तीअभावी ट्रॅकवर अतिक्रमणे झाली आणि खड्डेही पडले. प्रशासनाने त्याकडे दुर्लक्ष केले. पर्यावरण, आरोग्याच्या दृष्टीने सायकल चालविणे गरजेचे आहे. एकेकाळी सायकलींसाठी ओळखल्या जाणाऱ्या या शहरात सायकलींना जागाच नाही.
– जुगल राठी, सायकल प्रतिष्ठान