गत दोन ते तीन महिन्यांपासून पुण्यात सातत्याने अमली पदार्थांचे सेवन केल्याच्या तरुणांच्या चित्रफिती समाज माध्यमांत व्हायरल होत आहेत. ललित पाटील ड्रग्ज प्रकरण, दौंड तालुक्यातील कुरकुंभ एमआयडीसीतील १००० कोटींचा ड्रग्ज साठा मिळाल्याच्या प्रकरणांनी संपूर्ण जिल्हा हादरून गेला असताना पोलीस आणि उत्पादन शुल्क विभाग मात्र तितकासा सक्रीय नसल्याचे आरोप होत आहेत. रविवारी फर्ग्युसन रस्त्यावरील एका पबमध्ये अमली पदार्थांचे सेवन केल्याचा दावा करणारी चित्रफीत रविवारी समाजमाध्यमात व्हायरल झाली. त्यापाठोपाठ लगोलग सोमवारी नगर पुणे रस्त्यावरच्या हॉटेलमधील तशीच एक चित्रफीत समोर आली आहे.
व्हायरल होत असलेली चित्रफीत नेमकी कधीची आहे, हे अद्याप समोर येऊ शकलेले नाही. दोन तरूणी हॉटेलच्या वॉशरूममध्ये अमली पदार्थाचे सेवन करत असल्याचे दिसत आहेत. कुणीतरी एक जण त्यांना वॉशरूमधून बाहेर निघण्याची विनंती करत आहे. मात्र त्याच्या विनंतीला मुली दाद देत नसल्याचे दिसते.
पुण्यातील पबमध्ये अजूनही अमली पदार्थांचा धूर
पुण्यातील नामदार गोपाळ कृष्ण गोखले रस्त्यावरील पबमध्ये ड्रग्जचे सेवन केल्याचा दावा करणारी चित्रफीत रविवारी समाज माध्यमात व्हायरल झाली. त्यानंतर पुणे पोलिस आणि उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने बारवर छापा टाकून पाच जणांना चौकशीसाठी ताब्यात घेतले. दरम्यान, ‘हा प्रकार अत्यंत गंभीर असून, स्थानिक पोलिस ठाण्याच्या निरीक्षकांसह जबाबदार घटकांना तातडीने निलंबित करावे,’ असे निर्देश केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी पोलिस आयुक्तांना दिले.
फर्ग्युसन रस्त्यावरीललिक्विड लिझर लाऊंज बारमध्ये पहाटे पाचपर्यंत पार्टी सुरू होती. त्या वेळी प्रसाधनगृहात काही तरुण अमली पदार्थांचे सेवन करत आहेत, असा दावा व्हायरल व्हिडिओच्या माध्यमातून करण्यात आला आहे. हा व्हिडिओ समोर आल्यानंतर पोलिस आयुक्त अमितेशकुमार यांनी प्रकरणाची चौकशी करून कारवाईचे आदेश दिले.
राजकीय आरोप प्रत्यारोपांना सुरूवात
दरम्यान, या प्रकारावरून राजकीय आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. शिवाजीनगर परिसरात सर्वाधिक महाविद्यालये आणि शाळा आहेत. अशा परिसरात अमली पदार्थाचे सेवन होत असताना राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधिकारी झोपा काढतात का,’ असा प्रश्न आमदार रवींद्र धंगेकर यांनी उपस्थित केला आहे. तसेच, उत्पादन शुल्क मंत्री शंभुराजे देसाई यांना कारवाई करण्याचे आवाहनही त्यांनी केले आहे.