Pune Drugs Case: एल-थ्री बारमधील वादग्रस्त पार्टीत MD पुरवठा करणाऱ्या तिघांना अटक; पुणे पोलिसांनी असा रचला सापळा

प्रतिनिधी, पुणे

नामदार गोपाळ कृष्ण गोखले रस्त्यावरील (फर्ग्युसन रस्ता) ‘लिक्विड लिझर लाउंज’ (एल-थ्री) बारमध्ये झालेल्या वादग्रस्त पार्टीत मेफेड्रोनचा (एमडी) पुरवठा करणाऱ्या तिघांना पोलिसांनी शुक्रवारी अटक केली. त्यामध्ये एका नायजेरियन व्यक्तीचा समावेश असून, या तिघांच्या अंगझडतीत ‘एमडी’ आणि ‘कोकेन’ हे अंमली पदार्थ सापडले आहेत. हे आरोपी अंमली पदार्थांची देवाण-घेवाण करत असून, त्यांनी शहरातील कोणकोणत्या हॉटेल-बारमध्ये अंमली पदार्थांची विक्री केली आहे, याचा तपास पोलिस करणार आहेत.

अभिषेक अमोल सोनवणे (वय २३, रा. डिझेल कॉलनी, रेल्वे क्वार्टर), ओंकार अशोक सकट (वय २८, रा. महात्मा फुले पेठ) आणि इडोको स्टॅव्हली संडे (रा. नायजेरिया) अशी अटक आरोपींची नावे आहेत. त्यांच्याविरोधात अंमली पदार्थ प्रतिबंधक कायद्यासह (एनडीपीएस), महाराष्ट्र दारूबंदी कायदा, महाराष्ट्र पोलिस अधिनियम, सिगारेट व तंबाखूजन्य उत्पादने कायद्यानुसार गुन्हे दाखल करण्यात आले असून, न्यायालयाने त्यांना २ जुलैपर्यंत पोलिस कोठडी सुनावली. अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी ए. यू. सुपेकर यांनी हा आदेश दिला.
Baramati Crime: ३७ लाखांच्या बैलावरुन राडा, बारामतीत गोळीबार, मध्यरात्री थरार

असे सापडले आरोपी

‘एल-थ्री’ बारमध्ये मध्यरात्री पार्टी सुरू असून, स्वच्छतागृहात दोघे तरुण अंमली पदार्थाचे सेवन करत असल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. या ‘व्हिडिओ’त दिसणारे नितीन नथुराम ठोंबरे आणि करण राजेंद्र मिश्रा यांना पोलिसांनी अटक केली. पार्टीदरम्यान एका व्यक्तीने ‘एमडी’ हा अंमली पदार्थ ‘ऑफर’केल्याची कबुली ठोंबरे आणि मिश्रा यांनी पोलिसांच्या चौकशीत दिली. या पार्टीत ‘ड्रग्ज’ देणारा व्यक्ती शिवाजीनगर येथील कामगार पुतळा परिसरात वारंवार येत असतो, असे मिश्रा याने सांगितले. त्यानंतर पोलिसांनी सापळा रचून अभिषेकला अटक केली. त्याच्या खिशातून एक ग्रॅम कोकेन पोलिसांनी जप्त केले. अभिषेकने हे कोकेन ओंकार आणि इडोकोकडून घेतल्याचे सांगितले. त्यानंतर महात्मा फुले पेठेतून ओंकार आणि इडोकोला अटक केली. त्यावेळी ओंकारकडे सहा-सात ग्रॅम ‘एमडी’ची पावडर आणि इडोकोकडे २.८ ग्रॅम कोकेन सापडले, अशी माहिती तपास अधिकारी चंद्रशेखर सावंत आणि सहायक सरकारी वकील श्रीधर जावळे यांनी न्यायालयात दिली. बचाव पक्षातर्फे अॅड. अमोल नराल यांनी बाजू मांडली.

या मुद्द्यांवर पोलिस करणार तपास

– आरोपींनी ‘कोकेन’ आणि ‘एमडी’ कोणाकडून आणले, त्यांचे शहरातले साथीदार कोण, याचा शोध घेणार.
– आरोपी अंमली पदार्थ विकण्यासाठी मोबाइल व सोशल मीडियाचा वापर करत असून, त्यांचा मोबाइल तपासणार.
– आरोपींनी अंमली पदार्थ कोणाकोणाला विकले, कोणकोणत्या हॉटेल-बारमध्ये अंमली पदार्थांची विक्री केली, याचा तपास करणार.
– आरोपींनी अंमली पदार्थांच्या विक्रीसाठी ऑनलाइन व्यवहार केले असून, त्यातून आलेल्या पैशांचे काय केले, यासाठी त्यांचे बँक स्टेटमेंट तपासणार.

‘माझा पासपोर्ट हरवला’

नायजेरियन आरोपी इडोको याला न्यायालयात हजर केले असता, तो भारतात कशासाठी आला आणि पासपोर्ट कुठे आहे, अशी विचारणा अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकाऱ्यांनी केली. त्यावर मी इथे व्यवसायासाठी आलो असून, २०१९ पासून पासपोर्ट हरविले असल्याने भारतातच राहात आहे, असे इडोकोने सांगितले. त्यामुळे आरोपी बेकायदा वास्तव्य करत आहे का, याचाही तपास पोलिस करणार आहेत.