फर्ग्युसन रस्त्यावर कारवाईचा धडका
फर्ग्युसन रस्त्यावरील ‘एल-३’ बारमध्ये दोन दिवसांपूर्वी रात्रभर चाललेल्या पार्टीमध्ये तरुणांकडून अमली पदार्थांचे सेवन करण्यात आल्याचा ‘व्हिडिओ’ व्हायरल झाला होता. त्यानंतर पुणे पोलिसांची झालेली नाचक्की आणि सरकारच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते. या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी ‘एल ३’ बारसह बेकायदा हॉटेलवर बुलडोझर फिरविण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार महापालिका प्रशसनाने मंगळवारी सकाळपासूनच खराडी, बालेवाडी आणि फर्ग्युसन रस्त्यावर कारवाईचा धडका लावला होता.
‘एल ३’चे काउंटर फोडले
महापालिका प्रशासनाने ‘एल ३’ बारवर कारवाई केली. या बारमधील बार काउंटर हातोड्याच्या साह्याने तोडण्यात आले. फर्ग्युसन रस्त्यावरील इतर हॉटेलवरही जोरदार कारवाई झाली. हॉटेल त्रिवेणी आणि शेजारील दुकानांबाहेर असलेले शेड तोडण्यात आले. त्यानंतर महापालिकेचा मोर्चा हॉटेल वैशालीकडे वळला. हॉटेल वैशालीनंतर ‘एल ३’ बारवर कारवाई करण्यात आली. फर्ग्युसन रस्त्यावरील हॉटेलवर सर्वाधिक कारवाई करण्यात आली.
‘हायस्ट्रिट’ला दणका
बालेवाडी हायस्ट्रिटवरील अनेक हॉटेलसमोर असलेले बेकायदा शेड महापालिकेने बुलडोझरने पाडले. या परिसरातील नऊ हॉटेलवर कारवाई करून सुमारे ११ हजार चौरस फुटांवरील बेकायदा बांधकाम, शेड पाडण्यात आले. महापालिकेने शहरात केलेल्या एकूण कारवाईत आतापर्यंत ४० हजार चौरस फूट बेकायदा बांधकाम पाडण्यात आले आहे.
महापालिका प्रशासनाने नामदार गोपाळकृष्ण गोखले रस्त्यावर (फर्ग्युसन रस्ता) आणि इतर ठिकाणी मोठ्या प्रमाणात कारवाई करून सुमारे ४० हजार चौरस फूट बेकायदा शेड, बांधकाम पाडले आहे. यामध्ये दुकाने, बारच्या फ्रंट; तसेच साइड मार्जिनमध्ये उभारलेल्या शेडवर कारवाई करण्यात आली.
– बिपीन शिंदे, कार्यकारी अभियंता, पुणे महापालिका